Pune Crime News | टिंबर मार्केट येथील व्यापार्याचे अपहरण करुन दीड कोटींची खंडणी मागणार्यांना 24 तासाच्या आत पकडून व्यापार्याची केली सुखरुप सुटका, गुन्हे शाखेची कामगिरी
पुणे : Pune Crime News | टिंबर मार्केट येथील व्यापार्याचे अपहरण करुन त्यांच्या सुटकेसाठी दीड कोटी रुपयांची खंडणी मागणार्या ५ गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत व्यापार्याची सुटका केली.
सौरभ विश्वनाथ पवार Saurabh Vishwanath Pawar (वय २७, रा. सागर सोसायटी, बावधन), शिरीष जितेंद्र खोपडे Shirish Jitendra Khopde (वय २६, रा. श्री गणेश निवास, आंबेगाव पठार), मंदार श्रीधर दारवटकर Mandar Shridhar Darwatkar (वय ३०, रा. राजवर्धन हाईटस, वडगाव), साहिल श्रीकांत खुटवड Sahil Shrikant Khutwad (वय २१, रा. काशिदनगर, भिलारेवाडी, कात्रज), प्रणव बबन निवगुणे Pranav Baban Nivgune (वय २३, रा. गणेश सोसायटी, आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत व्यापार्याच्या पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २४ मार्च रोजी पहाटे १ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापार्याचे टिंबर मार्केटमध्ये दुकान आहे. ते २३ मार्च रोजी नेहमीप्रमाणे दुकानात गेले होते. परंतु, रात्री ते घरी परत आले नाही. मध्यरात्री एक वाजता त्यांचा पत्नीला व्हॉटसअॅप कॉल आला. अज्ञात लोकांनी जबरदस्तीने त्यांच्या सोबत नेले असून मला डांबुन ठेवले आहे. माझ्या जीवाला धोका आहे. १ कोटी ५० लाख रुपये तयार ठेवायला सांग, मी तुला दोन तासांनी परत फोन करतो, असे बोलले. त्यानंतर फोन बंद केला. या घटनेने घाबरलेल्या व्यापार्याच्या पत्नीने पोलिसांना याची माहिती दिली. स्वारगेट पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली.
गुन्हे शाखा समांतर तपास सुरु केला. त्याचवेळी अपहरण करणार्या आरोपींनी ही रक्कम मित्र मंडळ चौक येथे आणून देण्यास सांगितल्याने घटनेचे गाभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या दोन टिम तयार करण्यात आल्या. एक टिम ही रक्कम घेऊन मित्र मंडळ चौक येथे आरोपींची वाट पहात असताना दोघे जण ही रक्कम घेण्यासाठी आले. पोलिसांनी प्रणव निवगुंणे व साहिल खुटवड यांना पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, व्यापार्याचे अपहरण करुन तिघा जणांनी खेड शिवापूर येथे नेले. या माहितीवरुन पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन व्यापार्याची सुखरुप सुटका केली. पाच जणांना पुढील कारवाईसाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण येथे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली राम राजमाने, पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, प्रशांत अन्नछत्रे, अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, तसेच युनिट १ व २, खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
