Pune Crime News | फसवणुक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हाजी अब्दुल गफुर पठाण यांच्या भावावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | फ्लॅट आणि गोडावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेवकाच्या भावावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुसेन अहमद पठाण Hussain Ahmed Pathan (वय ५०, रा. दत्तवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हाजी अब्दुल गफुर पठाण (Haji Abdul Gafur Pathan) यांचे ते भाऊ आहेत.
याबाबत अश्विनी दिलीप सारंदा (वय ३१, रा. गणेश पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन पठाण यांचे अम्मार डेव्हलपर्स अँड बिल्डर्स ही फर्म आहे. गणेश पेठेतील अमान प्लाझा या इमारतीत एक फ्लॅट ३८ लाख ४० हजार रुपये आणि गोडावून २१ लाख ८५ हजार रुपयांमध्ये देण्याचे ठरले. एकूण ६० लाख २५ रुपयांमध्ये देण्याचे ठरले होते. तसा करारनामा २०१६ मध्ये करण्यात आला होता. याशिवाय इलेक्ट्रीक कनेक्शन, मीटर व सोसायटी फॉमेशन चार्जेस, वकील फी इतर खर्चापोटी २ लाख रुपये देण्याची अट होती.
२० टक्के रक्कम त्यांनी भरायची व ८० टक्के कर्जाने घेऊन द्यायची ठरले होते. त्याप्रमाणे पठाण मागणी करेल, त्याप्रमाणे त्यांनी पैसे दिले. असे असतानाही त्याने खरेदीखत केले नाही. ते कर्जाचे हप्ते भरत होते. बिल्डरकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कर्जाचे हप्ते भरण्याचे बंद केले. बिल्डरकडे खरेदीखतासाठी प्लॅट व गोडावुनच्या ताबा मिळावा यासाठी पाठपुरावा करत होते. तो टाळाटाळ करत होता. त्यानंतर त्यांना समजले की त्यांना विकण्यात आलेल्या फ्लॅटची टॅक्स पावती बिल्डरने स्वत:चे नावावर पुणे मनपा कडून करुन घेतली आहे. २०१६ मध्ये नोटरी करार करुनही २०२४ पर्यंत त्याने ताबा न दिल्याने शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर खडक पोलिसांनी हुसेन पठाण विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करीत आहेत.
