Pune Crime News | किरकोळ बाचाबाचीतून अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न, 5 अल्पवयीन मुले ताब्यात
पुणे : Pune Crime News | शेजारी शेजारी राहणार्यांमध्ये दुपारच्या वेळी झालेल्या किरकोळ कारणावरुन झालेल्या बाचाबाचीतून अल्पवयीन मुलांनी तरुणावर कोयत्याने डोक्यात, टाळूवर, पाठीवर, बरगडीवर सपासप वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आंबेगाव पोलिसांनी ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
विशाल शिवाजी शेळके (वय २६, रा. भोलेनगर, आंबेगाव खुर्द) हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
ही घटना आंबेगाव येथील भिमाई चौकाजवळील शंभो निवास बिल्डिंगसमोर २६ मार्च रोजी रात्री सव्वाअकरा वाजता घडली. सादर शेख (वय १९) याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल शेळके व आरोपी हे एकाच ठिकाणी रहायला आहेत. २६ मार्च रोजी दुपारी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली होती. त्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजता विशाल शेळके व त्याचे मित्र पायी भिमाई चौकातून जात होते. त्यावेळी सादर शेख व त्याच्या साथीदारांनी विशाल शेळके याला अडविले. त्याच्या डोक्यात, पाठीवर, कानावर, बरगडीवर, मांडीवर कोयत्याने सपासप वार करुन दहशत निर्माण केली. गंभीर जखमी झालेल्या विशाल शेळके याला मित्रांनी तातडीने रुग्णालयात नेले. आंबेगाव पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.
