Sandeep Khardekar | मुठा नदीतील कचरा साफसफाईची मागणी; बाबा भिडे पुलाचे काम कधी पूर्ण होणार?, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांचा सवाल
पुणे : Sandeep Khardekar | शहरातील मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्यामुळे पर्यावरण आणि स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा जवळ येत असताना या कचऱ्याची तातडीने सफाई करण्याची मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.
डेंगळे पूल ते म्हात्रे पूल या दरम्यानचा नदीपात्राचा भाग अत्यंत अस्वच्छ झाला असून, या ठिकाणी साचलेला कचरा पावसाळ्यात वाहून जाऊन इतर भागात अडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कवडीपाट परिसरात यापूर्वी अशा कचऱ्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण कमी झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
तसेच नदीपात्रात मेट्रो प्रकल्पाचे साहित्य पडून असल्याचे सांगण्यात आले असून, पावसाळ्यापूर्वी ते हटविणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, बाबा भिडे पुलाचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून, वारंवार वाहतूक बंद करूनही काम अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पुलाचे काम नेमके कधी पूर्ण होणार आणि बॅरिकेड्स कधी हटवले जाणार, याबाबत स्पष्ट माहिती जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या सर्व बाबींवर पुणे महापालिकेने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
