Pune Crime News | अजमेर सहलीच्या वर्गणीवरुन झालेल्या वादात 18 वर्षाच्या युवकावर वार करुन केला खुन, खडक पोलिसांनी दोघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | एकत्र शिकणार्या युवकांचा ग्रुप अजमेरला सहलीला गेला होता. या सहलीच्या खर्चासाठी वर्गणी काढण्यात आली होती. त्यावरुन झालेल्या वादातून चौघांनी युवकाच्या छातीवर, खांद्यावर, पोटावर वार करुन त्याचा निर्घुण खुन केल्याचे समोर आले आहे.
अबुबकर अमजद खान (वय १८, रा. ए डी कॅम्प चौक, नाना पेठ) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. खडक पोलिसांनी कमरअली सय्यद (वय १९) आणि तुफेल सय्यद (वय १९, दोघे रा. विमाननगर) यांना अटक केली असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अल्तमश पिंजारी (वय १९, रा. मोमिनपुरा सिटी टॉवर बिल्डिंग, घोरपडी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना काशेवाडी येथील त्रिकोणी गार्डनजवळ ११ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत एकत्र शिकलेले युवक १० -१२ दिवसांपूर्वी अजमेरला सहलीला गेले होते. त्यासाठीच्या खर्चासाठी त्यांनी वर्गणी काढली होती. त्यांच्यातील एकाने तिथे गेल्यावर वर्गणी देतो, असे सांगितले होते. ते सर्व जण अजमेरला गेल्यावर त्याने आता माझ्याकडे पैसे नाहीत, असे म्हणून हातवर केले. तेव्हा या युवकांमध्ये अजमेरमध्ये वाद झाला होता. त्यानंतर ते सर्व जण पुण्याला परत आले. पैशांचा हा वाद मिटविण्यासाठी शनिवारी रात्री हे सर्व जण काशेवाडीमध्ये एकत्र आले होते. त्यावेळी त्यांच्यात पैशांवरून पुन्हा वाद झाला. तेव्हा कमर अली सय्यद, तुफेल सय्यद व त्यांच्या दोघा अल्पवयीन साथीदारांनी अबुबकर खान याच्यावर धारदार हत्याराने खांद्यावर, पोटावर, तसेच पाठीच्या मागील बाजुस, छातीवर मारुन गंभीर जखमी केले. लोखंडी हत्याराने पोटात भोसकून त्याचा खुन केला. तसेच फिर्यादी अल्तमश पिंजारी याला लाकडी बांबुने मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सुतार तपास करीत आहेत.
