Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमास 20 वर्षाची कारावासाची शिक्षा
पुणे : Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीला ड्रेस खरेदी करुन देण्याच्या बहाण्याने उरुळी देवाची येथील लॉजवर घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्यास विशेष न्यायालयाने २० वर्षाचा कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सुनिल कोंडिबा जेधे Sunil Kondiba Jedhe (वय ४६, रा. भिवडी, ता. पुरंदर) असे या नराधमाचे नाव आहे. ही घटना जानेवारी २०२० ते १४ नोव्हेंबर २०२० दरम्यान आरोपीच्या घरी घडली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी पी रागीट यांनी हा निकाल दिला आहे.
सुनिल जेधे याने अल्पवयीन मुलीला ड्रेस खरेदी करुन देण्याच्या बहाण्याने उरुळी देवाची येथील लॉजवर घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला होता. तसेच वारंवार स्वत:च्या घरी तिच्यावर अत्याचार केला होता. लोणी काळभोर पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही पी झिंजुर्के यांनी केला. त्यातील आरोपीविरुद्ध मुदतीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी पी रागीट यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सबळ साक्षीपुराव्या अंती न्यायालयाने सुनिल कोंडिबा जेधे याला ११ एप्रिल २०२६ रोजी २० वर्षे सश्रम कारावास व ३० हजार रुपयांचा दंड व दंड नसल्यास १ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अरुंधती ब्रम्हे, कोर्ट पैरवी पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव, पोलीस अंमलदार अश्विनी पवार यांनी कामकाज पाहिले. या कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून पोलीस उपायुक्त डॉ़ राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी, पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव, पोलीस अंमलदार अश्विनी पवार व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक व्ही पी झिंजुर्के (सध्या नेमणूक गांधीनगर पोलीस ठाणे, कोल्हापूर) यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.
