Pune Crime News | 10 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षांसाठी तडीपार; 135 गुन्हेगारांवर तात्पुरत्या स्वरुपात हद्दपारीची कारवाई
पुणे : Pune Crime News | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरी होण्याकरीता पुणे शहरातील गुन्हेगारी वृत्तीस आळा घालणे व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी चंदननगर, विमानतळ, लोणीकंद या पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील १० सराईत गुन्हेगारांना २ वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तसेच १३५ गुन्हेगारांवर तात्पुरत्या स्वरुपात हद्दपारीची कारवाई पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी केली आहे.
चंदननगर पोलीस ठाणे :
अभिजित संजय जाधव (वय २९, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) याला अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री करणे, चोरी करणे अशा गुन्ह्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
अविनाश मुरलीधर मेटे (वय ३६, रा. विठ्ठलनगर, वडगाव शेरी) याला जुगार खेळणे, अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री करणे असे गुन्ह्यांसाठी तडीपार केले आहे.
गगन तानाजी शिंदे (वय २४, रा. दयासागर सोसायटी, डुक्कर गल्ली, राहुल चाळ, वडगाव शेरी) याच्यावर अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिषाने लैंगिक अत्याचार करणे, गंभीर दुखापत करणे असे गुन्हे आहेत.
संकेत अमोल बांदल (वय २७, रा. दत्तप्रसाद सोसायटी, वडगाव शेरी) याच्यावर दंगा करणे, दुखापत करणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे असे गुन्हे आहेत.
सचिन भिमराव मातंग (वय २५, रा. वृंदावन सोसायटी, आव्हाळवाडी रोड, वाघोली) याच्याविरुद्ध जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.
वाघोली पोलीस ठाणे :
आदित्य बापू शिंदे (वय २५, रा. ट्रेनिटी आयकॉन सोसायटी समोर, वाघोली) याच्यावर बेकायदेशीरपणे अग्नी शस्त्र बाळगणे, दंगा करणे, दहशत पसरवणे, दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहेत.
बिरा रामदास श्रीराम (वय ३८, रा. हांडगर वस्ती, भावडी, ता. हवेली) याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, इतरांच्या जिवितास धोका निर्माण करणे, दंगा करणे असे गुन्हे आहेत.
लोणीकंद पोलीस ठाणे :
मालती संतोष मलके (वय ४५, रा. आण्णासाहेब साठेनगर, वाघमारे वस्ती, पेरणेफाटा, ता. हवेली) यांच्यावर अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री करणे, बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करीता बाळगणे असे गुन्हे आहेत.
मच्छिंद्र शंकर पवार (वय ३८, रा. थेऊर रोड, लोणीकंद) याच्यावर अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री करण्याचे गुन्हे दाखल आहेत.
विमानतळ पोलीस ठाणे :
साईनाथ ऊर्फ कडुबापू विठ्ठल पाटोळे (वय २७, रा. एस आर ए बिल्डिंग, विमाननगर) याच्याविरुद्ध संघटित टोळी तयार करुर सदोष मनुष्यवध करणे, दुखापत करणे, दंगा करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.
परिमंडळ ७ च्या कार्यक्षेत्रातील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणखी १०० हून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत, असे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सांगितले.
