Pune Crime News | पुण्यात अशोक खरातचा नवा अवतार ! पतीबरोबरील मतभेद दूर करण्याचे आश्वासन देऊन महिलेवर केला लैंगिक अत्याचार, 50 लाखांची फसवणुक करणार्या देवऋषीवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | नाशिक येथील महिलांवरील अत्याचार करणार्या अशोक खरात याची काळी कृत्य गाजत असताना पुण्यातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीबरोबरील मतभेद दुर करुन तुम्हाला एकत्र ठेवू शकतो, असे आश्वासन देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्या देवऋषीवर स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ४२ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी औदुंबर मनोहर गडदे Audumbar Manohar Gadde (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या स्वत:ला देवऋर्षी म्हणणार्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ मे २०२१ ते १७ मार्च २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी औदुंबर गडदे याने आपण देवऋर्षी असल्याचे सांगून तुमची अडलेली कामे करुन देतो, तुमचे पती तुमच्याजवळ नाहीत. तुमच्यामधील मतभेद दूर करुन तुम्हाला एकत्रित ठेवू शकतो, असे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्याशी ओळख वाढवून त्यांना स्वारगेट येथील लॉजवर बोलावले. तेथे त्यांच्याशी शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर लोणेरे, उतेखोल, माणगाव या ठिकाणी फिर्यादी यांच्याशी वारंवार शारीरीक संबंध ठेवले.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांचे स्वत:चे वैयक्तिक काम आहे, नोकरी लावतो, बिल्डिंग लाईनमध्ये पैसे गुंतवा, तुम्हाला जादाचा परतावा देतो, बंगलो घेऊन देतो, असे सांगून फिर्यादी यांच्याकडून ५० लाख ५५ हजार रुपये वेळोवेळी घेतले. फिर्यादी या एकट्या राहत असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्याशी जवळीक केली. त्या रहात असलेल्या ठिकाणी दारू पिऊन शिवीगाळ व दमदाटी करुन जबरदस्तीने फिर्यादी यांच्याशी शारीरीक संबंध ठेवून ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील तपास करीत आहेत.
