Pune Crime News | रात्रपाळीत झोपण्यावरून झालेल्या वादातून साथीदाराने सुरक्षारक्षकाचा गमज्याने गळा आवळून केला खुन; खराडीतील स्पॅनोलाईफ सोसायटीतील पहाटेची घटना
पुणे : Pune Crime News | सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असताना क्लब हाऊसच्या खोलीत कोणी झोपायचे, यावरुन वाद झाल्याने तरुणाने आपल्या साथीदार सुरक्षारक्षकाचा गमजाने गळा आवळून खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी सुरक्षारक्षक तरुणाला अटक केली आहे.
पांडुरंग भाऊराव खारवणे (वय ५२, रा. मांजरी बुद्रुक) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी सुदर्शन माणिक काळे Sudarshan Manik Kale (वय २२, रा. तुळजाभवानीननगर, खराडी) याला अटक करण्यात आली.
याबाबत खारवणे यांचा मुलगा बाळु पांडुरंग खारवणे (वय ३०, रा. मांजरी बुद्रुक) यांनी खराडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना खराडी येथील स्वीट इंडिया चौकाजवळील स्पॅनोलाईफ सोसायटीमध्ये सोमवारी पहाटे अडीच वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग खारवणे आणि सुदर्शन काळे हे खराडीतील स्पॅनोलाईफ सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. रविवारी रात्रपाळीत खारवणे आणि काळे कामाला होते. काळे हा आठ ते नऊ महिन्यांपासून सोसायटीत काम करत आहे. खारवणे यांनी काही महिन्यांपूर्वी नोकरी सोडली होती. त्यानंतर ते पुन्हा कामावर रूजू झाले होते. रविवारी रात्रपाळीत दोघे जण होते. दोघांनी कामाची विभागणी केली. रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत नियोजन करुन तीन तास झोप घ्यायची, असे त्यांच्यात ठरले होते. झोपायला पहिले कोण जाणार, या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. काळे याने गळ्यातील गमजाने खारवणे यांचा गळा आवळला. त्यामुळे खारवणे बेशुद्ध पडले. त्यानंतर घाबरलेल्या काळेने पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बेशुद्धावस्थेतील खारवणे यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन काळे याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक साहेबा पोटे तपास करीत आहेत.
