Nashik Crime | नाशिकमधील धर्मांतर रॅकेटची ‘मास्टरमाइंड’ निदा खान: कॉर्पोरेट विश्वात कसं विणलं होतं जाळं?

crime-logo

नाशिक :  Nashik Crime | नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत उघडकीस आलेल्या लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या धक्कादायक प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवनवीन आणि अंगावर शहारे आणणारे खुलासे समोर येत आहेत. या संपूर्ण रॅकेटची मुख्य सूत्रधार म्हणून कंपनीतील टीम लीडर निदा एजाज खान हिचे नाव समोर आले असून, तिच्या एका भयानक ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या प्लॅनचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी निदा खान ही या गुन्ह्यातील आठवी आरोपी असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता आपली पथके अधिक सक्रीय केली आहेत.

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, निदा खान ही या कंपनीच्या ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावर कार्यरत होती. नवीन रुजू होणाऱ्या तरुणींच्या प्रशिक्षणापासून त्यांच्या कामाच्या नियोजनापर्यंत सर्व गोष्टी तिच्या नियंत्रणात होत्या. याच अधिकाराचा गैरवापर करून तिने हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्याचे षडयंत्र रचले होते. निदा खान जाणीवपूर्वक ठराविक हिंदू मुलींना हेरून त्यांना विशिष्ट मुस्लिम आरोपींकडेच कामाच्या प्रशिक्षणासाठी पाठवत असे. तिथे या मुलींचा ‘ब्रेनवॉश’ करणे, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे आणि नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकणे अशी ही साखळी सुरू होती.

निदा खानची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती. दररोज सकाळी होणाऱ्या कामाच्या मीटिंगमध्ये ती मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर मानसिक दडपण आणत असे. ज्या मुली या दबावाला बळी पडत नसत, त्यांचा इतर आरोपींच्या माध्यमातून लैंगिक आणि मानसिक छळ करण्यासाठी ती चिथावणी देत असल्याचेही उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कंपनीत नमाज पठण करण्यासाठी सक्ती करणे, विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्यासाठी दबाव टाकणे आणि इस्लामिक रीतिरिवाजांचे पालन करण्यास भाग पाडणे यामध्ये निदा खानचा सक्रिय सहभाग होता. हे सर्व प्रकार एका गुप्त व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हाताळले जात होते, ज्याचे धागेदोरे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कंपनीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाने नाशिकमधील युनिटमध्ये आपली चौकशी पथके पाठवली असून, १५० कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली असून, त्यामध्ये कंपनीच्या एचआर (HR) अश्विनी चेनानीचाही समावेश आहे. मात्र, या प्रकरणाचा मुख्य दुवा असलेली निदा खान अद्यापही फरार आहे. तिच्या अटकेनंतर या रॅकेटमध्ये आणखी किती बडे चेहरे सामील आहेत आणि हे रॅकेट किती खोलवर रुजले आहे, हे स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली असून, त्यांचे पथक लवकरच नाशिकचा दौरा करणार आहे.

You may have missed