Rohit Pawar | 2029 च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ लढत? रोहित पवारांचे संकेत

rohit pawar

पुणे : Rohit Pawar | २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत पाहायला मिळू शकते, असा अंदाज आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. बारामतीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

जय अजित पवार यांनी २०२९ मध्ये बारामतीतून उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांची आणि पक्षाची इच्छा महत्त्वाची असते. संबंधित पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसार उमेदवारी निश्चित होईल. जर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार नसतील, तर त्यांच्या पक्षाकडून दुसरा उमेदवार उभा राहू शकतो.

रोहित पवार पुढे म्हणाले की, “आमचे आणि त्यांचे पक्ष वेगळे असल्यामुळे भविष्यात ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही लोकसभा निवडणुकीत अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती.”

भावनिक दृष्टीकोनातून आम्ही सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सहभागी झालो, मात्र राजकीय वास्तव वेगळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पवार कुटुंब एकत्र यावे, ही लोकांची इच्छा असली तरी राजकारणात काही कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि काही गोष्टींचा त्यागही करावा लागतो, असे ते म्हणाले.

दरम्यान, जय अजित पवार यांनीही बारामतीकरांची इच्छा लक्षात घेता २०२९ मध्ये उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी काळात बारामतीच्या राजकारणात मोठे समीकरण बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

You may have missed