PCMC News | पिंपरी-चिंचवडमध्ये 15 आरएमसी प्रकल्प सील; महापालिकेची धडक कारवाई

PCMC-News

पिंपरी : PCMC News | शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांवर मोठी कारवाई करत १५ प्रकल्प सील केले आहेत. पर्यावरण विभागाच्या शोधपथकाने एकूण २२ प्रकल्पांची तपासणी केली होती.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आलेल्या या तपासणीत अनेक प्रकल्पांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव, परिसरात पाण्याची फवारणी न करणे, उघड्यावर बांधकाम साहित्य साठवणे आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन अशा बाबी समोर आल्या. यामुळे नियमभंग करणाऱ्या १५ प्रकल्पांवर तात्काळ सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली.

उर्वरित प्रकल्पांनाही महापालिकेकडून कडक इशारा देण्यात आला आहे. हवा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली बसविणे, प्रकल्पाभोवती संरक्षक शेड्स उभारणे, नियमित पाण्याची फवारणी करणे आणि धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाय तत्काळ राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे पालन न केल्यास पुढील काळात कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरात वाढत्या बांधकाम आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या धूळकणांमुळे वायू प्रदूषणात मोठी वाढ होत असून, याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे.

मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले की, बांधकाम प्रकल्पांनी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक सर्व उपाय अनिवार्यपणे राबवणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई सुरूच राहणार आहे.

——————————–

वेलकॉन आरएमसी (भीमनगर, मोशी), ओम डेव्हलपर्स अँड बिल्डर्स (रावेत), पी.आर. इन्फ्राटेक (पवारवस्ती, ताथवडे), डीएमआर बिल्डर्स प्रा. लि. (एनएचएझ प्रोजेक्ट, पवार वस्ती, ताथवडे), क्लिनर्जी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (आदर्शनगर, मोशी), ए अँड ए इन्फ्रा प्रा. लि. वाघेश्वर आरएमसी प्लांट (मोशी), मोहनलाल मथराणी प्रा. लि. (आरएमसी प्लांट, मोशी), ग्रे स्टोन आरएमसी प्लांट (सीएनजी-पेट्रोल पंपामागे, पिंपळे निलख), श्वेता आरएमसी प्लांट (मार्लिन ग्रुप, वाकड), एम इन्फ्रा आरएमसी प्लांट (ताजणे वस्ती, पुनावळे), एम कॉर्न आरएमसी प्लांट (काटे वस्ती, पुनावळे), जे. कुमार आरएमसी प्लांट (जुना देहू-आळंदी रोड, भीमनगर, पिंपरी), शिवांश कन्स्ट्रक्शन (आरएमसी प्लांट, चऱ्होली), नागेश्वर इन्फ्रा आरएमसी प्लांट (डुडुळगाव) आणि  भाटे अँड राजे आरएमसी प्लांट (तापकीर मळा, रहाटणी) या आरएमसी प्रकल्पांवर महापालिकेने कारवाई केली आहे.

You may have missed