Supriya Sule On Ajitdada Accident | “उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताचा एफआयआर नाही, हे दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
बारामती : Supriya Sule On Ajitdada Accident | अजित पवार विमान अपघात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर सूचक टीका केली. “ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात मृत्युमुखी पडतात, त्या घटनेचा एफआयआर होत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे त्या म्हणाल्या. बारामती पोटनिवडणुकीत मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.
सुळे यांनी सांगितले की, काँग्रेसशासित राज्यात रोहित पवार यांच्या प्रयत्नांमुळे या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आणि न्याय मिळविण्याचा प्रयत्न झाला. “महाराष्ट्रातही ही प्रक्रिया वेळेत व्हायला हवी होती,” असे त्यांनी नमूद केले.
पोटनिवडणुकीबाबत बोलताना त्यांनी भावना व्यक्त केल्या. “अजित पवारांना जाऊन तीन महिनेही झाले नाहीत, आणि पोटनिवडणूक जाहीर झाली, ही दुर्दैवी बाब आहे. तरीही संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाने मतदान करून आपले कर्तव्य बजावावे,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सुळे म्हणाल्या की, मतदान करण्याची त्यांची इच्छा होती; मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी प्रवास टाळला. उष्णतेमुळे त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील भाजप मोर्चावरही त्यांनी टीका केली. “लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे; मात्र त्यातून नागरिकांची गैरसोय होऊ नये. रस्ते अडवून आंदोलन करण्याऐवजी नियोजित ठिकाणी आंदोलन करावे,” असे त्या म्हणाल्या.
विरोधकांच्या एकजुटीबाबत बोलताना त्यांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि इतर राज्यांतील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत केंद्र सरकारविरोधात विरोधक एकत्र येत असल्याचे संकेत दिले.
