Pune PMC News | महिलांसाठी आनंदाची बातमी ! पुण्यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरमिळकतीवर 50% करसवलतीचा प्रस्ताव मंजूर

Pune PMC News | Good news for women! Proposal for 50% tax concession on house ownership up to 500 square feet in Pune approved

पुणे : Pune PMC News |  पुणे महापालिका हद्दीतील महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना मिळकत करात ५० टक्के सवलत देण्याच्या योजनेला स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी याबाबत माहिती दिली.

महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, आता तो सर्वसाधारण सभेच्या संमतीनंतर राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

या योजनेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १४०-अ आणि १४०-ब अंतर्गत करसवलतीच्या तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे. मात्र, ही सवलत काही अटी व शर्तींवर लागू असेल. ३१ मार्च २०२५ पर्यंत ज्या मिळकती महिलांच्या नावावर नोंद आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. ही सवलत फक्त आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील चालू कर मागणीपुरती मर्यादित राहील.

तसेच, १ एप्रिल २०२६ पूर्वीची थकबाकी, व्याज, दंड आणि शास्तीवर कोणतीही सवलत लागू होणार नाही. अनधिकृत मिळकतींवरील शास्ती कायम राहणार असून संबंधित नियमही लागू राहतील. सध्या ४० टक्के सवलत असलेल्या मिळकतींना ५० टक्क्यांऐवजी २५ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव आहे.

महिलांच्या नावावर मालमत्ता नोंदणीस प्रोत्साहन देणे आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, महापालिकेच्या उत्पन्नात होणारी घट लक्षात घेता या प्रस्तावावर मुख्य सभेत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

 उत्पन्नात २० कोटींची संभाव्य घट

महापालिकेच्या आकडेवारीनुसार अशा प्रकारच्या मिळकतींची संख्या सुमारे ७०,७७३ आहे. या मिळकतींपासून सुमारे ४०.४८ कोटी रुपये कररूपाने उत्पन्न मिळते. प्रस्तावित सवलतीमुळे अंदाजे २० कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत मुख्य विधी अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेण्यात आला असून त्यालाही मान्यता देण्यात आली आहे.

You may have missed