Maharashtra Din | शानदार संचलनाने महाराष्ट्र स्थापना दिन साजरा ! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्रदान
पुणे : Maharashtra Din | शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शानदार संचलनाद्वारे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला. या वेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील एकुण १४ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ध्वजारोहण करुन पोलीस दल, गृहरक्षक दल, येरवडा कारागृह पोलीस, अग्निशामक दल, होमगार्ड नागरी सुरक्षा दल, वन विभाग या संचलन पथकाची पाहणी केली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, अपर पोलीस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) सुहास वारके, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पंकज देशमुख, राजेश बनसोडे, पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल, इतर विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस आयुक्तालयातील सर्व परिमंडळीय पोलीस उप-आयुक्त, विभागीय सहा. पोलीस आयुक्त उपस्थित होते.
संचलन परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, सेकंड अन कमांडर प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संजीवकुमार नाईक यांनी केले. पथसंचलनामध्ये एकुण १३ प्लाटुन होते. त्यामध्ये पुणे शहर दलाकडील ३, पुणे ग्रामीण, पुणे लोहमार्ग, पिंपरी-चिंचवड, एसआरपीएफ ग्रुप नंबर १ व २, पुणे येरवडा कारागृह, होमगार्ड, व नागरी सुरक्षा दल यांचे प्रत्येकी एक प्लाटुन, वन विभाग यांचे कडील २ प्लाटुन तसेच ध्यान पथकाकडील ऑस्कर ध्यान हा परेड मध्ये सहभागी झाला होता, ११२ नंबर वाहन, जलद प्रतिसाद पथक, वरूण वाहन, अग्निशामक दल, शासकीय रूग्ण वाहिका अशी वाहने सहभागी झाली होती, त्याचप्रमाणे पुणे शहर, य पुणे ग्रामीण कडील वाद्यवृंद हा सहभागी झाला होता, परेड करीता २० अधिकारी व ३०४ जवानांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस अंमलदार निकम पिंपरी चिंचवड यांनी केले.
