Pune Crime News | सिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन चिंचवडच्या तरुणीने आपले जीवन संपविले, 300 फुट खोल दरीत सापडला मृतदेह

Pune Crime News | Chinchwad girl ends her life by jumping from Sinhagad Fort, body found in 300 feet deep valley

पुणे : Pune Crime News | गेले २ दिवस बेपत्ता असलेल्या चिंचवडमधील तरुणीने सिंहगड किल्ल्यावरुन दरीत उडी मारुन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

मनीषा धर्मदास गायकवाड (वय २८, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा गायकवाड ही मुळची नांदेड जिल्ह्यातील धनेगाव येथील राहणारी आहे. ही सध्या चिंचवडमधील बिजलीनगर येथे रहात होती. मनिषा ही २८ एप्रिल पासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांनी त्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना तिची माहिती पाठविण्यात आली होती. तांत्रिक तपासामध्ये तिची लोकेशन सिंहगड किल्ला दिसून आले. त्यानंतर सिंहगड किल्ल्यावर तिची बॅग, मोबाईल आणि इतर साहित्य आढळून आले. त्यानंतर हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, सहायक फौजदार गिरे, प्रवीण ताकवणे तसेच सिंहगड वन विभाग, अग्निशमन दल, हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक तरुणांनी शोध मोहिम हाती घेतली.

दोन दिवस चाललेल्या या शोधमोहिमेनंतर आपत्ती व्यवस्थापन पथकातील तरुण दोराच्या सहाय्याने रॅपलिंग करत खोल दरीत उतरले. किल्ल्याच्या परिसरातील तोफ खान्याजवळील बुरुजाच्या खाली दरीत त्यांनी मनिषाचा मृतदेह शोधून काढला. गिर्यारोहक पथकातील कृष्णा मरगळे, तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोलासकर, नारायण जावळकर, संजय चोरगे, उत्तम पिसाळ, संतोष भगत, वैभव भोसले यांनी तरुणीचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. वनविभागाचे अधिकारी समाधान पाटील, बळीराम वायकर, संदीप कोळी यांनी पथकाला सहकार्य केले. मनिषा गायकवाड हिने आपले जीवन का संपविले, याचे नेमके कारण अद्याप समजले नाही. हवेली पोलीस तपास करीत आहेत.

You may have missed