Pune Crime News | 9 वर्षाच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेल्या आजोबाला नागरिकांनी दिला चोप; शेजारी राहणार्‍या महिलेच्या दक्षतेने नात वाचली

Pune Crime News | Citizens beat up grandfather who tried to rape 9-year-old granddaughter; granddaughter saved by alertness of woman living next door

पुणे : Pune Crime News | नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करुन तिचा खुन केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी पर्वती पायथा परिसरात आजोबानेच आपल्या ९ वर्षाच्या नातीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. शेजारी राहणार्‍या महिलेने मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून वेळीच इतरांना हा प्रकार सांगितल्याने नातीवरील अत्याचाराचा प्रसंग टळला. नागरिकांनी या ७० वर्षाच्या नराधम आजोबाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या घटनेनंतर पर्वती पायथा परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

https://www.instagram.com/p/DX_FDgrsXTO

हा नराधम ७० वर्षाचा असून तो पिडित मुलीच्या आईचा वडिल आहे. तो दीड महिन्यांपासून येथे भाड्याने घर घेऊन राहिला लागला होता. त्याने ९ वर्षाची नात व नातू यांना आपल्या खोलीत बोलावले. नातूला खाऊ आणण्यासाठी पैसे देऊन त्याला बाहेर पाठविले. त्यानंतर त्याने नातीचे कपडे काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही मुलगी रडु लागली. पत्र्याचे घर असल्याने मुलीच्या रडण्याचा आवाज शेजारी राहणार्‍या महिलेने ऐकला. मुलगी का रडते, हे पाहण्यासाठी तिने शेजारील खोली पाहिली तर ती आतून बंद होती. त्यामुळे तिला संशय आल्याने तिने आरडाओरडा करुन इतरांना बोलावले. नागरिकांनी दार जोरजोरात ठोठावले. तेव्हा या नराधमाने मुलीला माळ्यावर पाठविले. दार उघडल्यावर नागरिक आत शिरले. तेव्हा मुलगी दिसून आली नाही. त्यांना माळ्यावर मुलगी रडत असल्याचे दिसल्याने त्यांनी मुलीला खाली घेतले. तिला धीर दिला. हा  नराधम काय करण्याचा प्रयत्न करत होता, हे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी या नराधमाला पकडून बाहेर आणले. त्याला चांगलाच चोप दिला.

https://www.instagram.com/p/DX_IjrLs90j

या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे व इतरांनी तिकडे धाव घेतली. पोलिसांनी नराधम आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण प्रतिबंध अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

हा प्रकार समजताच काही वेळात तेथे परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून त्या नराधमाला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी आरोपीला अटक केली असून नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन केल्यानंतर जमाव पांगला. पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे अधिक तपास करीत आहेत.

You may have missed