Pune Crime News | पुणे : एकमेकांकडे पाहण्यावरुन झालेल्या वादातून 5 अल्पवयीन मुलांनी युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केला निर्घुण खुन
पुणे : Pune Crime News | गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांच्या वाढत्या सहभागाबद्दल चर्चा होत असतानाच केवळ एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात पाच अल्पवयीन मुलांनी युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्याचा निर्घुण खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
नयन सचिन जाधव (वय १८, रा. आंबेगाव पठार) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना आंबेगाव पठार येथील निलगिरी चौक येथे ४ मे रोजी रात्री सव्वानऊ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयन जाधव हा बारावीमध्ये होता. आरोपी मुले काही काम करत नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात एकमेकांकडे रागाने का पाहतो, यावरुन भांडणे झाली होती. सोमवारी रात्री आरोपी मुले ही निलगिरी चौकात वाट पाहत थांबली होती. त्यावेळी नयन जाधव हा तेथे आला. या मुलांनी त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करुन तसेच सिमेंटचा ब्लॉक डोक्यामध्ये घातला. त्यात नयन जाधव हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर ही मुले पळून गेली. नयन याला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक कैलास कोडग तपास करीत आहेत.
