Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी करुन दोघा चोरट्यांनी रिझर्व्ह बँकेच्या सेवानिवृत्त मॅनेजरला घातला गंडा; दीड तोळ्याची सोन्याची चैन, 7 ग्रॅमची अंगठी ऐवजी मिळाले चार दगडाचे खडे

Pune Crime News | Two thieves pretending to be policemen robbed a retired manager of the Reserve Bank; instead of a gold chain worth one and a half tola, a ring weighing 7 grams, four stones were found

पुणे : Pune Crime News |  पोलीस असल्याची बतावणी करुन दोघा चोरट्यांनी एका ७० वर्षाच्या रिझर्व्ह बँकेच्या सेवानिवृत्त मॅनेजरला गळ्यातील चैन, अंगठी काढून कागदात गुंडाळून ठेवा, असे सांगून दीड तोळ्याची सोन्याची चैन, ७ ग्रॅमची अंगठी असा ऐवज हातचलाखी करुन काढून घेऊन चोरुन नेला.

याबाबत कर्वेनगर येथे राहणार्‍या एका ७० वर्षाच्या ज्येष्ठाने वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कर्वेनगर येथील डॉ. आंबेडकर चौकाजवळील पीएमपी बस स्टॉपजवळ ३ मे रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिझर्व्ह बँकेतून मॅनेजरपदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. ते दुचाकीवरुन डॉ. आंबेडकर चौकात सकाळी मासे खरेदी करण्यासाठी आले होते. पोलिसांसारखा गणवेश घातलेले दोघे जण दुचाकीसोबत थांबले होते. त्यांनी फिर्यादी यांना बोलावले. त्यांच्यातील एकाने हेल्मेट घातले होते. ते त्यांच्याजवळ गेल्यावर त्यांच्याकडे लायसन्स बाबत चौकशी केली. त्यांनी आम्ही पोलीस डिपार्टमेंटची माणसे आहोत, असे सांगून लायसन्सची वारंवार चौकशी करत होते. त्या दरम्यान त्यांनी दोघांना थांबवून त्यांच्याकडे सुद्धा लायसन्स ची चौकशी केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी पाहून त्यांच्यातील एक जण बोलला, अशी सोन्याची चैन, अंगठी घालून फिरायचे नाही़ आताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी सोन्याची चैन ओढून चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

तुम्ही लगेच ती चैन आणि अंगठी काढून तुमच्या खिश्यात ठेवा, असे सांगितले. त्यांच्यापैकी एकाने त्यांना एक कागद दिला. तो म्हणाला की, या कागदामध्ये गुंडाळून देतो, त्यावेळी त्यांनी चैन व अंगठी त्याच्याकडे दिली. त्याने अंगठी व चैन त्या कागदामध्ये गुंडाळून कागदाचा गुंडाळा त्यांच्याकडे दिला. तो कागदाचा गुंडाळा त्यांनी पॅन्टच्या खिश्यामध्ये ठेवला. त्यानंतर ते दोघे लगेच त्या ठिकाणाहून निघून गेले. फिर्यादीही घराकडे जाण्यासाठी निघाले. थोडे पुढे आल्यावर त्यांना शंका आल्याने त्यांनी गाडी थांबवुन कागद उघडून पाहिला तर, त्यात चैन व अंगठी ऐवजी चार दगडाचे खडे दिसून आले. त्यांनी परत जाऊन त्यांचा शोध घेतला पण ते मिळून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक भांबेरे तपास करीत आहेत.

You may have missed