Underground Tunnel Roads In Pune | पुण्यात वाहतूक कोंडीवर ‘पाताल लोक’ उपाय; 56 किमी भुयारी रस्त्यांचे जाळे उभारणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी प्लॅन!

Underground Tunnel Roads In Pune | 'Patal Lok' solution on transportation poles in Pune; Chief Minister Fadnavis' ambitious plan to build 56 km of underground roads

पुणे : Underground Tunnel Roads In Pune | शहरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी महत्त्वाकांक्षी ‘पाताल लोक’ प्रकल्प हाती घेतला असून, शहरात तब्बल ५६ किलोमीटर लांबीचे पाच भुयारी रस्ते उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून स्वतंत्र ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (SPV) कंपनी स्थापन केली जाणार असून, प्राथमिक अहवाल पुढील आठ दिवसांत राज्य सरकारकडे सादर होणार आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भूमिगत रस्त्यांची संकल्पना मांडली होती. त्यानंतर मुंबईत झालेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) अर्थसंकल्प बैठकीत या प्रकल्पाला गती देण्याबाबत चर्चा झाली. बैठकीत महापालिकेने पुढाकार घेत स्वतंत्र एसपीव्ही स्थापन करावे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

येरवडा ते कात्रज या दरम्यान भुयारी मार्ग उभारण्यासाठी यापूर्वी पीएमआरडीएकडे प्राथमिक आराखडा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आराखड्यात सुधारणा आवश्यक असल्याने आता महापालिकेला त्याच आधारे पुढील अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर ते कोंढवा खडीमशीन चौक, सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान ते औंधमार्गे जगताप डेअरी चौक, खडकी ते शास्त्रीनगर चौक, पु. ल. देशपांडे उद्यान ते सेव्हन लव्हज चौक तसेच बाणेर-पाषाण परिसरात भुयारी मार्गांचे जाळे उभारले जाणार आहे.

सुमारे ३४ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमण्याची तयारी सुरू असून, प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर राबवण्याचा विचार आहे. प्रस्तावित एसपीव्हीमध्ये महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि वाहतूक तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.

You may have missed