Pune Crime News | गोल्डन ज्युबली एज्युकेशन मधील साहित्य जबरदस्तीने चोरुन नेल्याप्रकरणी आबेदा इनामदार यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल; चुलत्याच्या छातीत धक्का मारुन खाली पाडल्याने हृदयविकाराचा झटका येऊन वृद्धाचा मृत्यु
पुणे : Pune Crime News | जागेच्या वादातून गोल्डन ज्युबली एज्युकेशन संस्थेतून १२ लाख रुपयांचे सामान जबरदस्तीने चोरुन नेल्याप्रकरणी आजम कॅम्पसच्या आबेदा इनामदार, त्यांच्या तीन मुलांसह १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. साहित्य नेताना त्याला विरोध केल्याने चुलत्याच्या छातीवर धक्का मारुन खाली पडल्याने वृद्धाला हृदयविकाराचा धक्का बसून त्यात त्यांचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत मुस्तफा सय्यद बाकरहुसेनी इनामदार (वय ३१, रा. पदमजी कम्पाऊंड, खेमी निवास, नाना पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी परवेज पिरपाशा अब्दुल रज्जाक इनामदार (Parvez Pirpasha Abdul Razzaq Inamdar), इफ्तिकार पिरपाशा अब्दुल इनामदार (Iftikhar Pirpasha Abdul Inamdar), तन्वीर पिरपाशा अब्दुल इनामदार (Tanveer Pirpasha Abdul Inamdar), आबेदा पिरपाशा अब्दुल रज्जाक इनामदार Abeda Pirpasha Abdul Razzak’s Inamdar (सर्व रा. दौलत बिल्डिंग, फिशर्स क्लबजवळ, पदमजी पार्क, नाना पेठ), आरिफ फकीर मोहम्मद चौधरी (Arif Fakir Mohammad Chowdhury), अफजल कादर खान (Afzal Kader Khan) व त्यांच्याबरोबर असलेले पाच बाऊंन्सर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भवानी पेठ येथील काशेवाडी येथे गोल्डन ज्युबली एज्युकेशनमध्ये रविवारी ३ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता घडला. त्यात शाहीद इनामदार (वय ६९) यांचा मृत्यु झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे चुलत भाऊ आहेत. त्यांचा गोल्डन ज्युबली एज्युकेशनच्या जागेवरुन वाद सुरु आहे़. आबेदा इनामदार या आझम कॅम्पस या शैक्षणिक संस्थेच्या प्रमुख आहेत. गोल्डन ज्युबली एज्युकेशन या संस्थेचा सध्या मुस्तफा सय्यद इनामदार यांच्या ताब्यात आहेत. रविवारी संस्था बंद असताना सकाळी ८ वाजता त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये आरोपींनी बेकायदेशीरपणे प्रवेश करुन या इन्स्टिट्युटमध्ये ठेवलेले पार्टेशन, लॅपटॉप, कॉम्प्युटर, बॅन्चेस, प्रोजेक्टर व इतर असे सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे साहित्य गाडीमध्ये भरुन चोरुन नेले. फिर्यादी यांना याची माहिती मिळताच ते त्यांच्या वडिलासह त्या ठिकाणी गेले. तेव्हा त्यांना तुम्ही येथे का थांबला असे म्हटले. त्यांनी ही जागा परवेज इनामदार व इफ्तिकार पिरपाशा अब्दुल रज्जाक इनामदार यांची आहे. त्यांनी आम्हाला येथील साहित्य बाहेर काढण्यास सांगितले आहे, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीचे वडिल शाहीद इनामदार यांच्या छातीवर धक्का मारुन खाली ढकलले. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीचे आई यांना परवेज व इफ्तिकार इनामदार यांनी धक्काबुक्की करुन त्यांचा विनयभंग केला. पत्नीला धक्काबुक्की केल्याने त्याचे वाईट वाटून फिर्यादीच्या वडिलांना धक्का बसला. ते अचानक खाली पडले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यांचा मृत्यु झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे तपास करीत आहेत.
