Pune Crime Court News | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचे शिर धडावेगळे करुन फिरणार्‍या नराधम पतीला जन्मठेपेची शिक्षा, 11 वर्षांनी लागला निकाल

Pune Court News

पुणे : Pune Crime Court News | चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचे शिर कुर्‍हाडीने धडावेगळे करुन कात्रज परिसरात फिरणार्‍या नराधम पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमीत जोशी यांनी जन्मठेप आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

रामचंद्र शेहू चव्हाण Ramchandra Shehu Chavan (वय ६३, रा. सुखसागरनगर, कात्रज, मूळ रा. उरनूर, गुलबर्गा, कर्नाटक) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नी सोनाबाई चव्हाण (वय ५५) हिचा ९ ऑक्टोबर २०१५ रोजी निर्घृण खून केला होता. याबाबत आरोपीची सून सुनीता रमेश चव्हाण हिने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. चव्हाण हा सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा. तो पत्नीच्या चारित्र्याचा संशय घ्यायचा. त्याने पत्नीवर कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह ओंडक्यावर ठेवले. कुर्‍हाडीने पत्नीचे हातपाय आणि शिर तोडले. पुरावा नष्ट करण्यासाठी शिर आणि रक्ताने माखलेली कुर्‍हाड हातात घेऊन तो कात्रज तलावाच्या दिशेने निघाला होता. त्या वेळी गस्त घालणार्‍या एका पोलिसाने आरोपीला पाहिले. त्याला ताब्यात घेऊन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नेले होते.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून २४ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली आरोपीची सून, शेजारी, शाळकरी मुलगी आणि चहाविक्रेत्या महिलेची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. न्यायालयाने साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

शेजारच्या इमारतीत राहणार्‍या कुटुंबाने घराच्या खिडकीतून ही घटना पाहिली होती. त्यापैकी एका साक्षीदाराने आरोपीला महिलेचे शिर आणि रक्ताने माखलेली कुर्‍हाड हातात घेऊन जाताना मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. नोकरीनिमित्त जपानमध्ये स्थलांतरित झालेल्या या साक्षीदाराने जपानमधून येऊन न्यायालयासमोर साक्ष नोंदवली. आरोपीच्या घरासमोर मोकळ्या जागेत शाळेत जाण्यासाठी थांबलेल्या एका नऊ वर्षांच्या मुलीने आरोपीला न्यायालयासमोर ओळखले. या घटनेनंतर आरोपी चव्हाण हा हातात शिर आणि हातात रक्ताने माखलेली कुर्‍हाड घेऊन निघाला होता. त्यावेळी एका चहा विक्रेत्या महिलेने त्याला पाहिले. तेव्हा महिलेला बकरे कापल्याचे वाटले. आरोपीने ‘बायकोला मारले’ असे सांगितल्यावर चहा विक्रेती महिला घाबरली. आरोपीने दिलेला हा न्यायबाह्य कबुलीजबाब सरकार पक्षाने न्यायालयात सिद्ध केला.

या खटल्याचा पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी पाठपुरावा केला. या खटल्याच्या कामकाजासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस निरीक्षक कैलास कोडग, उपनिरीक्षक रमेश चौधरी, पोलीस अंमलदार जितेंद्र सोनवणे, विशाल मदने, रेखा मोटे यांनी सहाय केले.

You may have missed