Gokul Dudh Sangh Election |  ‘गोकुळ’चा रणसंग्राम! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; 90 दिवसांत निवडणूक घेण्याचे आदेश

Gokul Dudh Sangh Election | 'Gokul's' struggle! Supreme Court's big decision; Orders to hold elections within 90 days

कोल्हापूर : Gokul Dudh Sangh Election | कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल देताना येत्या ९० दिवसांत गोकुळची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कायदेशीर वादावर पडदा पडला असून, कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय होते?

गोकुळच्या मावळत्या संचालक मंडळाची मुदत ४ मे २०२६ रोजी संपली होती. मात्र, या निवडणुकीपूर्वी संघाशी संलग्न असलेल्या सुमारे १३२० प्राथमिक दूध संस्थांच्या पात्रतेबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने या संस्थांच्या चौकशीचे आदेश दिले होते आणि ही चौकशी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक न घेण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाला ‘श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थे’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने स्पष्ट केले की, तांत्रिक कारणांमुळे किंवा संस्थांच्या चौकशीच्या नावाखाली लोकशाही प्रक्रिया (निवडणूक) प्रदीर्घ काळ लांबणीवर टाकता येणार नाही. त्यामुळे ९० दिवसांच्या आत ही निवडणूक पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निकालामुळे आता रखडलेली मतदार यादी आणि प्रत्यक्ष मतदानाचा मार्ग सुकर झाला आहे.

निवडणुकीला विलंब झाल्यामुळे राज्य सरकारने नुकतेच गोकुळवर ५ सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली होती. ६३ वर्षांच्या इतिहासात गोकुळवर प्रशासक येण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीची डेडलाईन निश्चित केल्यामुळे प्रशासकांचा कार्यकाळ मर्यादित राहणार आहे.

You may have missed