Pune Crime News | दुबईतून पत्नीला अ‍ॅपवर तिहेरी तलाक देणार्‍या पतीवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा; अनैतिक संबंधाबाबत विचारणा केल्याने केला छळ

Pune Crime News | Police register case against husband who gave triple talaq to wife on app from Dubai; Tortured for asking about immoral relationship

पुणे : Pune Crime News | अनैतिक संबंधाविषयी विचारणा केल्याने पत्नीचा छळ करुन बॉटीम अ‍ॅपवर बोलताना तीनदा तलाक तलाक तलाक म्हणून दुबईहून तिहेरी तलाक देणाऱ्या पतीवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नवाज पंडारा वलप्पील Navaj Pandara Valappil (मुळ रा. पी व्ही हाऊस, किरीयाड, स्वामीलजवळ, चिरकल, कन्नुर, केरळ सध्या रा. फ्रेगोरीयम, एलएलसी, एसओसी वेअर हाऊस उम रमुल, दिइरा, दुबई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत ३० वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ जुलै २०२३ ते २ मे २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सध्या माहेरी आलेल्या आहेत. त्यांचा विवाह केरळमधील नवाज पंडारा वलप्पील यांच्याबरोबर झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या चारित्र्याचा संशय घेतला. तसेच त्याचे इतर महिलांशी असलेल्या अनैतिक संबंधाबाबत फिर्यादी यांनी आरोपीकडे विचारणा केली. या कारणावरुन त्याने फिर्यादी यांना वेळोवळी मारहाण व शिवीगाळ करुन शारीरिक व मानसिक छळ केला.

या छळाला कंटाळून त्या माहेरी निघून आल्या. २ मे रोजी आरोपी याने फिर्यादी यांच्याशी बॉटीम अ‍ॅपवर बोलणे सुरु केले होते. बोलणे चालू असताना त्याने ‘‘मै तुम्हे होश हवास मे तलाक तलाक तलाक देता हू’’ असे म्हणून फिर्यादी यांना तिहेरी तलाक दिला आहे. कोंढवा पोलिसांनी मुस्लिम महिला विवाह अधिनियम संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करीत आहेत.

You may have missed