Pune Crime News | पुणे : दारु पिताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून केला खुन, मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | मॉलमध्ये काम करीत असलेल्या तरुणाबरोबर दारु पिताना झालेल्या वादातून त्याच्या डोक्यात दगड घालून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

लोकेश मानसिंग टेंबरे (वय ३०, र.. घोरपडी, मुळ रा. खाडेगाव, जि. नागपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस अंमलदार प्रदीप पांडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना घोरपडी येथील भाग्यश्रीनगरमधील लेन नंबर २, बी टी कवडे रोड येथील झेंडे यांच्या मालकीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये ७ मे रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश टेंबरे हा मुळचा नागपूरमधील राहणारा आहे. त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. तो एका मॉलमध्ये अहमदाबाद येथे काम करत होता. सात महिन्यांपूर्वी त्याची पुण्यातील मॉलमध्ये बदली झाली होती. तेव्हापासून तो घोरपडी येथे रहायला आहे.

लोकेश व त्याचा अल्पवयीन मित्र हे दोघे बी टी कवडे रोडवरील झेंडे यांच्या मालकीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये ६ मे रोजी रात्री बिअर पिण्यास बसले होते. त्यावेळी त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. या वादातून अल्पवयीन मुलाने टेंबरे याच्या डोक्यात, तोंडावर दगड घालून त्याचा खुन केला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मीता वासनिक यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्याच्याकडे आधार कार्ड व मोबाईलमध्ये मिळालेल्या माहिती वरुन त्याची ओळख पटली. धनकवडी येथील एका मित्राने त्याच्याविषयी माहिती दिली. त्यानंतर मुंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले तपास करीत आहेत.

You may have missed