FIR On Builder Amit Lunkad | जबरदस्तीने प्रवेश करुन प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणार्‍या बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज  ढाकलियासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल, वडगाव शेरी येथील घटना

FIR On Builder Amit Lunkad | A case registered against 30 to 40 people including builder Amit Lunkad, Raj Dhaklia, who tried to take possession of the plot by force, incident in Vadgaon Sheri

पुणे : FIR On Builder Amit Lunkad | वडगाव शेरी येथील प्लॉटमध्ये ट्रॅक्टर, डंपरसह कम्पाऊंट गेट तोडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज ढाकलियासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत रवींद्र हिरालाल दुगड (वय ५८, रा. पुष्पा हाईटस, बिबवेवाडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमित लुंकड, राज ढाकलिया (Raj Dhaklia), रुपेश ढाकलिया (Rupesh Dhaklia), बिडकर, अमित लुंकड यांचा मॅनेजर तसेच अन्य ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर ३० मध्ये ७ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. दरम्यान, यापूर्वी देखील अमित लुंकड यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत अनेकांनी तक्रारी दिलेल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र दुगड यांचा दुगड ग्रुप नावाने कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांनी वडगाव शेरी सर्व्हे नंबर ३० मधील ४० गुंठे जागा गलांडे व इतर ७ जणांनी तालेरा यांचे कडून सामाईकपणे घेतली होती. १९९५ ते २००२ पर्यंत त्यापैकी सुमित राठोड यांनी ३४.५ गुंठे जागा खरेदी केली होती. उर्वरित जागा ही लुंकड यांनी  खरेदी केली होती. २०२३ मध्ये सुमित राठोड यांच्याकडुन ३१ गुंठे जागा दुगड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपीच्या नावे व ३.५ गुंठे तेजस प्रविण दुगड यांच्या नावाने खरेदी खताने खरेदी केली होती. दुगड यांनी जागा खरेदी केल्यानंतर त्या जागेच्या ७/१२ वर त्यांचे नाव लागले आहे. तसेच जागा खरेदी करताना या जागेवर सुमित राठोड यांच्या ७ प्लॉटला सात प्रॉपर्टी टॅक्स होते. ते सुद्धा दुगड यांच्या नावावर केलेले आहे. तसेच सुमित राठोड यांच्या नावाचे दोन लाईट मीटर व वॉटर मीटर होत. ते फिर्यादी यांच्या नावावर करुन घेतले होते. या जागेवर बांधकामासाठी संरक्षण मंत्रालयाकडे एमओडीची एनओसी घेतली. फायरची प्रोव्हिजनल एनओसी घेतली. पुणे महानगरपोलिककडे जवळपास ५ कोटी रुपये चलन भरलेले आहे. गौण खनिजची परवानगी घेऊन रॉयल्टीचे पैसे भरले. त्यानंतर या जागेवर कंट्रोल ब्लासिटंगची परवानगी घेतली आहे. जागेवर बांधकामासाठी सर्व परवानग्या घेऊन दोन महिन्यांपासून काम चालु केलेले आहे. त्या ठिकाणी सध्या काम सुरु आहे. या कामाची पाहणी करण्याकरिता दोन सुपरवायझर, दोन वॉचमन, सिनिअर इंजिनिअर यांची नियुक्ती केलेली आहे.

७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता फिर्यादी यांचा मुलगा ऋषभ दुगड यांचा फोन आला. आपला सुपरवायझर विशाल पवार याने फोन करुन कळविले की, अमित लुंकड, राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया, बिडकर, अमित लुंकडचा मॅनेजर व इतर ३० ते ४० जणा आठ दहा ट्रॅक्टर, दोन तीन डंपर, वॉटर टॅकर घेऊन आलेले असून त्यांनी साईटचे समोरील दोन्ही गेटचे पत्रे तोडले आहेत. त्यांनी त्यांची सर्व वाहने आपल्या प्लॉटमध्ये घुसवली आहेत. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मुलगा तातडीने वडगाव शेरी येथील प्लॉटवर गेले. पोलीसही तेथे आले. तेव्हा तेथे अमित लुंकड याने बरोबरचे लोकांना फिर्यादी ला मारण्याच्या धमक्या देऊन इथून तुम्ही निघुन जावा, हा आमचा प्लॉट आहे. त्यावेळी विमाननगरचे पोलीस निरीक्षक आले. त्यांनी फिर्यादी व अमित लुंकड यांचे म्हणणे ऐकून घेतले. तेव्हा फिर्यादी यांनी अमित लुंकडच्या गाडीमध्ये हत्यारे आहेत, असे म्हटले असता तो गाडीमध्ये बसुन पळून गेला. तसेच त्यांच्या बंदुके नावाच्या वॉचमनला मारहाण केल्यामुळे तो निघुन गेला होता. प्लॉटचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करीत आहेत.

You may have missed