Pune ACB Trap Case | वारसनोंदसाठी लाच घेताना महिला तलाठी व कोतवाल यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन केली अटक
पुणे : Pune ACB Trap Case | वडिलोपार्जित जमिनीच्या सात बारावर वारस नोंद करण्यासाठी साडेपाच हजार रुपयांची लाच घेताना खेड राजगुरुनगरमधील निमगाव खंडोबा येथील तलाठी व कोतवालाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन रंगेहाथ पकडले.
ग्राम महसूल अधिकारी/तलाठी मनीषा साहेबराव माने Manisha Sahebrao Mane (वय ४५, रा. उमादर्शन सोसायटी, राजगुरुनगर, खेड), कोतवाल निमगाव खंडोबा दत्तात्रय छबु चव्हाण Dattatreya Chhabu Chavan (वय ५८, रा. खरपुडी बुद्रुक, खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार यांचे वडिल व इतर नातेवाईक यांचे नावे खरपुडी बुद्रक येथे वडिलोपार्जित जिरायत जमीन आहे. वडिलांचे २०२४ मध्ये निधन झाले आहे. त्यामुळे या जमिनीवर वारसनोंद घेण्यासाठी तक्रारदार यांनी ६ मार्च २०२६ रोजी निमगाव खंडोबा ग्राम महसूल कार्यालय येथील अधिकारी मनीषा माने यांना अर्ज दिला. वारंवार चौकशी केली तरीही तक्रारदार व त्यांचे भाऊ आणि बहिणीचे जमिनीला वारसा नोंद केली नाही. ३० एप्रिल २०२६ रोजी तक्रार हे वारसा नोंदणी बाबत चौकशी करण्याकरीता निमगाव खंडोबा ग्राम महसूल कार्यालयात गेले असताना माने यांनी चव्हाण यांना तक्रारदार यांच्याकडे वारसा नोंद करण्यासाठी पैसे घेण्यास सांगितले. ७ मे रोजी तक्रारदार चव्हाण याला भेटले असता त्याने माने व स्वत:साठी ६ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्याबाबत त्याचदिवशी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीची ८ मे रोजी पडताळणी केली. त्यात मनीष माने व चव्हाण यांनी तक्रारदारांच्या कामासाठी तक्रारदाराकडे तडजोडीअंती ५०० रुपये स्टॅम्प व वारसा नोंद करण्याकरीता ५ हजार रुपये अशी ५ हजार ५०० रुपयांची मागणी केली. त्यानंतर निमगाव खंडोबा ग्राम महसुल कार्यालय येथे सापळा रचण्यात आला. मनीषा माने व चव्हाण यांना तक्रारदाराकडून पैसे घेताना पकडण्यात आले. राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे व त्यांचे सहकारी यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक अविनाशा घरबुडे तपास करीत आहेत.
