Pune Crime News | दोघा वाहन चोरट्यांना पकडून पौड पोलिसांनी चार मोटारसायकली केल्या जप्त
पुणे : Pune Crime News | विनानंबर प्लेटच्या मोटारसायकलवरुन जाणार्या दोघांना थांबवुन चौकशी केल्यावर ते दोघे वाहन चोर असल्याचे उघडकीस आले. पौड पोलिसांनी त्यांच्याकडून ४ मोटारसायकली जप्त केल्या असून २ गुन्हे उघडकीस आले आहेत.
साहिल नवनाथ गोडांबे Sahil Navnath Godambe (वय २०, रा. गोडांबेवाडी घोटावडे ता. मुळशी) आणि शुभम सुरेश मातेरे Shubham Suresh Matere ( वय २३, रा. मातेरेवाडी घोटावडे ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पौड परिसरातील वाहन चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. वाहन चोरीला आळा घालण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी तपास पथकाला दिल्या होत्या. पौड पोलीस तपास करीत असताना घोटावडे येथील हनुमान चौकातून दोघे जण एका विना नंबर प्लेटच्या मोटारसायकलवरुन जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी दोघांना थांबवून चौकशी केली. त्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी एका अल्पवयीन मुलासह आम्ही पौड व हिंजवडी परिसरातील चार मोटारसायकली चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून चार मोटारसायकली जप्त केल्या असून पौड व हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. दोन मोटारसायकलीचे चासी नंबरवरुन त्यांची माहिती काढण्यात येत आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीसअधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी, पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस हवालदार दिलीप सुपे, सिद्धेश पाटील, गौतम लोकरे, प्रशांत बुणगे, पोलीस अंमलदार सुशांत गायकवाड, बाबासो पाटील, संदीप दराडे यांनी केली आहे.
