Sandeep Ghodke Passes Away | दैनिक प्रभातचे छायाचित्रकार संदीप घोडके यांचे निधन

Sandeep Ghodke Passes Away | Dainik Prabhat photographer Sandeep Ghodke passes away

पुणे : Sandeep Ghodke Passes Away |   दैनिक प्रभातचे वरिष्ठ छायाचित्रकार संदीप अशोक घोडके (वय ४६) यांचे गुरुवारी (दि. २१ मे) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे पत्रकारितेसह सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. विश्रांतवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  दैनिक प्रभातमध्ये रुजू झाल्यानंतर दीड दशकाहून अधिक काळ त्यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पुण्याच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी अचूक टिपल्या. कर्तव्यदक्ष छायाचित्रकार असण्यासह पुणे स्टेशन परिसरात त्यांची स्वतःची वृत्तपत्र एजन्सीही होती. ते पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सदस्य होते. एक मनमिळावू, कष्टाळू आणि नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या या अकाली एक्झिटने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

दैनिक प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाश भट, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, आमदार बापू पठारे आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी श्रद्धांजलीपर भाषणात संदीप यांच्या कामाचा गौरव केला. याप्रसंगी दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक रविकुमार इंडी, मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक प्रवीण पारखी, एचआर व्यवस्थापक प्रवीण थूल, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, नगरसेवक बॉबी टिंगरे, सुहास टिंगरे, सुरेंद्र पठारे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पोलीस व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांसह छायाचित्रकार आणि नातेवाईक उपस्थित होते.

You may have missed