Pune Crime News | पुण्यात ॲसिड हल्ल्याने खळबळ! लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला; आरोपी कर्नाटकातून अटकेत
पुणे : Pune Crime News | शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली असून, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीवर आणि तिच्या मित्रावर भररस्त्यात ॲसिडसदृश रासायनिक पदार्थ फेकून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातील हुबळी येथून अटक केली आहे. प्रेमातून निर्माण झालेला राग आणि एकतर्फी हट्ट या हल्ल्यामागे कारणीभूत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
ही घटना २० मे रोजी पहाटे दोनच्या सुमारास ताडीवाला रोड परिसरात घडली. पीडित २१ वर्षीय तरुणी आणि तिचा मित्र पुण्यातील एका हॉटेलमध्ये काम करतात. काम संपल्यानंतर दोघेही राहत्या घरी परतत असताना आरोपीने त्यांचा रस्ता अडवला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीराम मधु सावनेर Shriram Madhu Savner (वय ३०, मूळ रा. मध्यप्रदेश) असे आहे. पोलिस तपासानुसार, संबंधित तरुणी आरोपीसोबत राहण्यास नकार देऊन मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहत असल्यामुळे तो संतापला होता. त्याने तरुणीला अडवत, “तू माझ्यासोबत का राहत नाहीस? तू माझी नाही झालीस तर कोणाचीच होऊ देणार नाही,” अशी धमकी दिली.
यानंतर आरोपीने स्वतःसोबत आणलेल्या प्लास्टिकच्या ड्रममधील तीव्र ज्वलनशील रासायनिक पदार्थ अचानक तरुणीवर फेकला. या हल्ल्यात तरुणीच्या मान, पाठ आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. तिच्या मदतीला धावलेल्या मित्रावरही आरोपीने हल्ला केल्याने तोदेखील जखमी झाला.
घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. मात्र शहराच्या मध्यभागी घडलेल्या या गंभीर घटनेमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली. गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा माग काढला आणि कर्नाटकातील हुबळी येथे सापळा रचून त्याला अटक केली.
या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून, आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्तअमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वीनी सातपुते, पोलीस उप आयुक्त गौहर हसन, सहा पो आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोहवा सुरेंद्र जगदाळे, पोहवा नितीन मुंढे, पोहवा कानिफनाथ कारखेले, पोहवा तानाजी देशमुख, पोहवा जामगे, पोशि पवन भोसले, पोशि काटे, पोहवा. रविंद्र रोकडे, पोहवा. घावटे, पोहवा. कुसाळकर, पोहवा. आढारी, पोहवा. राऊत, पोहवा. शेख, पोहवा अजिनाथ येडे, पोहवा. उदय राक्षे, पो.शि. आझाद पाटील, पो.शि. प्रशांत शिंदे (तांत्रिक विश्लेषन) यांनी केली आहे.
