Pune Crime News | ‘लिव्ह इन’ मध्ये राहणार्या प्रियकराने व्यवसायासाठी पर्सनल लोन काढायला सांगून तरुणीची 18 लाखांची फसवणूक; पैसे मागितल्यावर अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देणार्या जळगावच्या तरुणावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ राहणार्या प्रियकराने बिअर शॉपीचा व्यवसाय करण्यासाठी तरुणीला १८ लाखांचे वैयक्तिक कर्ज काढायला लावले. त्यानंतर तिने पैसे परत मागितल्यावर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत केशवनगरमध्ये राहणार्या एका २८ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोहित अतुल पाटील Rohit Atul Patil (वय ३१, रा. श्रीरामनगर, चोपडा, जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०१६ पासून सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि रोहित पाटील यांची जून २०१६ मध्ये जळगावमधील एम आर कॉलेजमध्ये बी बी एम शिकत असताना ओळख झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. या दरम्यान, त्यांच्यात परस्पर संमतीने शारीरिक संबंध आले. पुढील शिक्षणासाठी ही तरुणी पुण्यात आली. तो ही तिच्याबरोबर राहू लागला़ रोहित वारंवार दुसर्या मुलासोबत बोलते, म्हणून संशय घेऊन वेळोवेळी मारहाण करत. त्यातून २०२२ मध्ये ते वेगळे झाले. रोहित गावी निघून गेला. तरुणी एका बँकेत कामाला लागली. तिचे २०२३ मध्ये लग्न झाले. दरम्यान, रोहित या तरुणीला वारंवार फोन करुन पैसे मागत असे. पैसे दिले नाही तर सोबतचे फोटो पतीला पाठविण्याची दमदाटी करत असे. काही वर्षांनी दोघा पती पत्नीत न पटल्याने त्यांनी घटस्फोट घेतला.
फेब्रुवारी २०२५ मध्ये रोहित हा पुन्हा केशवनगर येथे तिच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहायवयास आला. त्याने बिअर शॉपीचा व्यवसाय सुरु करायचा असल्याने तिला कर्ज काढायला सांगितले. तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून २ बँकांतून १८ लाख रुपयांचे कर्ज काढले. या कर्जाचा हप्ता रोहित भरणार होता. जुलै ते नोव्हेबर २०२५ पर्यंतचे हफ्ते त्याने भरले. त्यानंतर त्याने माझ्याकडे पैसे नाहीत, मी पैसे देऊ शकत नाही. तुला काय करायचे ते कर, असे म्हणाला. पुन्हा पैसे मागितले तर मारण्याची धमकी देऊन ‘‘तुझे फोटो, व्हिडिओ व्हायरल करीन,’’अशी धमकी देऊन तो मुळ गावी जळगावला निघून गेला. त्याने या तरुणीची ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी गहाण ठेवण्यासाठी घेतली होती. तीही परत दिली नाही. तिने वेळोवेळी कर्जाचे हफ्ते भरण्याबाबत फोन केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने फोन उचलणे बंद केले. शेवटी या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कवीराज पाटील तपास करीत आहेत.
