Pune Crime News | उत्तर प्रदेशातून बकरी खरेदीसाठी मेव्हण्याला पैसे पाठविण्यास सांगून दुकानातील गल्ल्यातील रोकड घेऊन दोघे नोकर झाले फरार, व्यवसायिकाची 8 लाखांची फसवणूक
पुणे : Pune Crime News | मटण व्यवसायासाठी उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी माझ्या मेव्हण्याला पैसे पाठवा, तो बकरे खरेदी करुन टेम्पोने पाठवले, असे सांगून पैसे पाठविण्यास नोकराने सांगितले. त्यानंतर दुकानातील गल्ल्यामधील १ लाख रुपये घेऊन दोघे नोकर फरार झाले. व्यवसायिकाची ८ लाखांची फसवणूक केली.
याबाबत इरफान रमजान खान (वय ४१, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अनिस कुरेशी, सलमान कुरेशी, टेम्पोचालक कादीर खान आणि चाँद ऊर्फ अब्दुल रहमान (सर्व रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धानोरीतील ए वन मटण शॉप या दुकानात १७ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान खान यांचे धानोरीत ए वन मटण शॉप हे दुकान आहे. दुकानामध्ये विक्रीसाठी असणारे बोकड ते उत्तर प्रदेशातून जाऊन स्वत: खरेदी करुन आणत असत. ऑक्टोंबर २०२५ मध्ये त्यांच्या दुकानामध्ये अनिस कुरेशी याला त्यांनी कामाला ठेवले. त्याने नोव्हेंबर २५ मध्ये सलमान कुरेशी याला दुकानामध्ये कामाकरीता आणले होते. दोघेही दुकानात कामाला होते. फिर्यादी हे उत्तर प्रदेशात जाऊन बकरी खरेदी करुन आणलेले होते. त्यावेळी त्यांचे घरी देखील राहिलेले होते. फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांना बकरी खरेदीसाठी प्रयागराज येथे जायचे होते. तेव्हा अनिस कुरेशी व सलमान कुरेशी यांनी सांगितले की, तुम्ही उत्तर प्रदेशाला जाण्याची गरज नाही. माझे मेव्हणे चाँद ऊर्फ अब्दुल रहमान तेथे आहेत. तुम्ही त्यांना पैसे पाठवा, ते तेथे बकरी खरेदी करुन आपल्याकडे पाठवून देतील. ते ज्या टेम्पोतून बकरी घेऊन येत होते. त्या टेम्पोचालक कादीर खान यानेही पैसे पाठवा, मी माल घेऊन येतो, असे सागितले.
त्यामुळे त्यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी १ लाख ८ हजार ८०० रुपये तसेच ९९ हजार ५००, ५० हजार, २५ हजार, ४५ हजार रुपये असे वेगवेगळ्या लोकांकडून त्यांच्याकडे एकूण ४ लाख ६८ हजार रुपये पाठवले. टेम्पोचालक कादीर खान याने त्यांना वेळोवेळी फोन करुन गाडीमध्ये बकर्या भरलेल्या असल्याचे सांगत होता. नंतर कादीर खान याने गाडीमध्ये ९० ते ९५ बकर्या भरलेल्या आहेत. आम्ही रात्री निघणार आहोत, डिझेलकरीता २० हजार रुपये पाठवा, असे सांगितले. त्यानंतर मध्यरात्री २ वाजता कादीरखान याने फिर्यादी यांचा मोठा भाऊ निसार खान यांच्या मोबाईलवर फोन करुन आम्ही जेवणाकरीता थांबलेलो असताना आपली बकर्यांनी भरलेली गाडी लुटून नेलेली आहे, असे सांगून त्याचा फोन बंद झाला. त्यानंतर त्यांनी त्यांचा मित्र यासिन फारुख हाश्मी यांना फोन करुन ही माहिती सांगून त्याचे गावाचे जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यास कादीर खान यांना सांगण्यास सांगितले. परंतु, कादीर खान याने कोणत्याही प्रकारची तक्रार तेथील पोलीस ठाण्यात दिली नाही.
दरम्यान, १८ फेब्रुवारीला हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी हे मध्यरात्री ३ वाजता हा प्रकार अनिस कुरेशी व सलमान कुरेशी यांना झालेला प्रकार सांगण्यास दुकानात गेले. परंतु, ते कोठे मिळून आले नाहीत. त्यांचे मोबाईलही बंद लागत होते. त्यांनी दुकानातील कॅश बॉक्स तपासला तर त्यातील १ लाख ५ हजार रुपये मिळून आले नाहीत. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी ते प्रयागराज येथे गेले होते. तेथे चाँद ऊर्फ अब्दुल रहमान याच्या घरी त्यांचा भाऊ निसार खान यांच्याकडून २ लाख २० हजार रुपये रोख घेऊन ते पैसे २६ मार्च २०२६ पर्यंत परत करण्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून दिले. परंतु, त्यांनी हे पैसे अद्याप परत केले नाहीत. तसेच बकरी न पाठविता ७ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक गंपले तपास करीत आहेत.
