Pune Police – Supriya Sule | सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलीस आयुक्तांचे प्रत्युत्तर; पुणे गुन्हेगारीची राजधानी नसल्याचा दावा

Pune Police - Supriya Sule | Police Commissioner's response to Supriya Sule's allegations; Claims that Pune is not the capital of crime

पुणे : Pune Police – Supriya Sule | शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा केला आहे. अधिकृत पत्राद्वारे त्यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीचा दाखला देत पुणे हे देशातील सुरक्षित शहरांपैकी एक असल्याचे स्पष्ट केले.

पोलीस आयुक्तांनी पत्रात म्हटले आहे की, पुणे हे देशातील गुन्हेगारीच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर असल्याचा दावा वस्तुस्थितीला धरून नाही. १ जानेवारी ते २७ मे २०२६ या कालावधीत मागील वर्षाच्या तुलनेत शहरातील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

पोलिसांच्या आकडेवारीनुसार साखळी चोरीत ५६ टक्के, जबरी चोरीत ३६ टक्के, वाहन चोरीत २८ टक्के, घरफोडीत १४ टक्के, खून आणि खुनाच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यांत १०.५ टक्के, बलात्काराच्या गुन्ह्यांत ७ टक्के तर शारीरिक दुखापतीच्या घटनांमध्ये ३ टक्क्यांनी घट झाली आहे. वाहन तोडफोडीच्या घटनांमध्येही ५० टक्क्यांनी घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

खुनाच्या काही घटनांमध्ये वाढ झाली असली तरी त्यातील अनेक प्रकरणे कौटुंबिक वादातून घडलेली असून त्यांचा रस्त्यावरील कायदा-सुव्यवस्थेशी थेट संबंध नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

एनसीआरबीच्या ‘क्राइम इन इंडिया’ अहवालानुसार देशातील १९ प्रमुख महानगरांमध्ये एकूण दखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीत पुणे १८ व्या क्रमांकावर असून, आयपीसी आणि बीएनएस अंतर्गत गुन्ह्यांच्या श्रेणीत १५ व्या स्थानावर असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

याशिवाय, शहरात ‘कोयता गँग’ नावाची कोणतीही संघटित टोळी कार्यरत नसल्याचे स्पष्ट करत सोशल मीडियावरून भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप पोलीस प्रशासनाने केला आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या नियमित नियामक आदेशाचा ‘लॉकडाऊन’ म्हणून चुकीचा प्रचार झाल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

संघटित गुन्हेगारी आणि अमली पदार्थांविरोधातील कारवाईबाबत माहिती देताना गेल्या दोन वर्षांत १,००० हून अधिक गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच २० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, २०२४ मध्ये ३,७०० कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

पत्राच्या शेवटी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विधायक टीकेचे स्वागत असल्याचे सांगत, वस्तुस्थितीविना केले जाणारे आरोप पोलीस दलाचे मनोबल खच्ची करतात, असे मत व्यक्त केले. पुणे हे शिक्षण आणि आयटी क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र असून शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

You may have missed