Pune Crime News | प्रेमप्रकरणातून तरुणीने गळफास घेत संपविले आपले जीवन; वारजे पोलिसांनी तरुणावर केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | प्रेमाच्या आणा भाका घेतल्यानंतर दुसर्या मुलीबरोबर मैत्री करुन तरुणीला झिडकावुन मानसिक त्रास दिल्याने एका तरुणीने गळफास घेत आपले जीवन संपविले. वारजे पोलिसांनी याला कारणीभूत असलेल्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तरुणीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन राज ठोंबरे (वय २३, रा. कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी भागात २१ वर्षीय तरुणी राहत होती. आरोपी तरुणाशी तिचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. राज ठोंबरे याने दुसर्या एका तरुणीशी मैत्री केली होती. तेव्हापासून तो तरुणीला टाळत होता. तिचा तिरस्कार करु लागला. तरुणीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने तिच्याशी भांडणे करुन मानसिक त्रास दिला. त्याच्या त्रासामुळे तरुणीने ४ एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविले़ सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक भांबेरे तपास करत आहेत.
