Pune Crime News | व्हिडिओ पाठवून तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन; लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणार्या महिलेसह तिचा पती, बहिण, मेव्हण्याला खराडी पोलिसांनी केली अटक, दुसर्या पतीवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | ४ वर्षे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणाने आपला भाऊ व नातेवाईकांना व्हिडिओ पाठवून गळफास घेऊन आपले जीवन संपविले. बलात्काराच्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देत असल्याने त्याने हे कृत्य केले. खराडी पोलिसांनी त्याच्याबरोबर राहणार्या महिलेसह तिचा पहिला पती़ बहिण व मेव्हणा अशा चार जणांना अटक केली आहे़ दुसऱ्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
करण बाळासाहेब कांबळे (वय २८, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी, मूळ रा. खरबा, मानवत, जि. परभणी) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रीती अनिकेत बोढर्डे उर्फ रमिसा उर्फ माही, उर्फ प्रीती सुधीर रणदिवे (वय ३१, रा. थिटे वस्ती, खराडी), अनिकेत बोढर्डे (वय ४१, रा. जेघेनगर, बिबवेवाडी), संस्कृती सुधीर रणदिवे (वय २५), ऋतीक सुधीर रणदिवे (वय २६, दोघी रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ करण कांबळे हा प्रिती बरोबर ४ वर्षे लिव्ह इन रिलेशनमध्ये रहात होता़ अनिकेत बोढर्डे हा प्रितीचा पहिला पती आहे़ संस्कृती ही प्रितीची बहिण असून ऋतिक रणदिवे हा मेव्हणा आहे़ अक्षय मुरलीधर निकम (वय ४०, रा़ नाशिक जेल रोड) हा प्रितीचा दुसरा पती असून त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत करण याचा भाऊ कृष्णा बाळासाहेब कांबळे (वय ३४, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी) याने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण काबळे हा भावाच्या वॉशिंग सेंटरमध्ये काम करत होता. त्याची प्रितीबरोबर ओळख झाली. गेली चार वर्षे ते लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये रहात होते. प्रिती हिचे यापूर्वी २ विवाह झाले होते. त्यांच्याकडे प्रितीचे दोन्ही पती, बहिण़ तिचा पती यांची ये जा होती . प्रिती हिच्या मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविन, अशी धमकी देऊन पैशांची मागणी करत होते. त्याच्याकडून वेळोवेळी पैसे उकळत होते. त्याला मानसिक त्रास देत होते. या सर्व त्रासाला कंटाळून करण कांबळे याने एक व्हिडिओ तयार केला. यांच्या त्रासामुळे आपण गळफास घेत असल्याचे सांगून हा व्हिडिओ त्याने आपला भाऊ व नातेवाईकांना १ जून रोजी पाठविला. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरु केली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खराडी केशवनगर पुलाच्या खाली नदीपात्रालगत एकाने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी तेथे जाऊन पाहिले असता तो करण कांबळे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चौघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर तपास करीत आहेत.
