Pune Crime News | चितळे बंधु, काका हलवाई दुकानांची शटर उचकटून चोरी करणार्या सराईत चोरट्यांचा शिवाजीनगर ते आंबेगाव परिसरातील 225 सीसीटीव्ही फुटेजवरुन मागोवा घेऊन केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | बाणेर येथील फॉच्युन हाऊस येथील चितळे बंधु व काका हलवाई या दुकानाचे शटर उचकटून चोरी करणार्या सराईत चोरट्यांचा शिवाजीनगर ते आंबेगाव परिसरातील तब्बल २२५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजद्वारे माग काढून दोघा सराईत गुन्हेगारांना बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी, आयफोन, पालघन, सोन्याचा शिक्का, रोख १२ हजार रुपये असा माल जप्त केला आहे.
शिवम दत्ता अवचार Shivam Dutta Avchar (वय १९, रा. कामठे कॉलनी, अभिनव कॉलेज, नर्हे), करण शिवाजी जमादार Karan Shivaji Jamadar (वय १९, रा. पॅरामोल कॅफेच्या शेजारी, सिंहगड कॉलेज जवळ, वडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बाणेर येथील फॉच्युन हाऊस येथील चितळे बंधु व काका हलवाई या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. लॉकरमध्ये ठेवलेले ६६ हजार रुपयांचे सोने व चांदीचे ऐवज व रोकड चोरुन नेली होती. १६ मार्च रोजी पहाटे साडेचार वाजता ही घरफोडी करण्यात आली होती. बाणेर पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावर मिळालेले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर, रामटेकडी, आळंदी, नर्हे, आंबेगाव परिसरातील तब्बल २२५ हून अधिक सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आरोपी निष्पन्न केले. हे दोघेही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न तसेच चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी वेळोवेळी आपल्या राहण्याच्या जागा बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हते. पोलिसांनी विशेष कौशल्य वापरुन आरोपींचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी एका अल्पवयीन मुलासोबत ही चोरी केल्याचे कबूल केले आहे. आरोपींकडून २ दुचाकी, आयफोन, पालघन, १२ हजार रुपये व एक सोन्याचा शिक्का जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे यांच्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक गणेश् रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, निकाळजे, अतुल इंगळे, प्रदिप खरात, शरद राऊत, गजानन अवातिरक, स्वप्निल मराठे, गणेश भोईने, समीर पवार यांनी केली आहे.
