Pune Kondhwa Accident | पुणे : कोंढव्यात भरधाव कारची महिलेला धडक; गंभीर दुखापतीमुळे डावा पाय कापण्याची वेळ

Pune Kondhwa Accident | Pune: Speeding car hits woman in Kondhwa; Time to amputate left leg due to serious injury

पुणे : Pune Kondhwa Accident | कोंढवा परिसरात भरधाव कारने पायी जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात महिलेच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांना शस्त्रक्रिया करून तिचा डावा पाय मांडीतून काढावा लागला.

जखमी महिलेचे नाव महादेवी दुरान्ना करदाळे (वय ६०, रा. मोहम्मदवाडी) असे आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या कारचालक जयराज पवार (MH 12 TK 0507 यावरील चालक) याच्यावर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जखमी महिलेचा मुलगा बसवराज दुरान्ना करदाळे (वय ३०, रा. मोहम्मदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. महादेवी करदाळे या एनआयबीएम रोडवरील एका घरात केअर टेकर म्हणून काम करत होत्या आणि तेथेच राहत होत्या.

३१ मे रोजी सकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमारास लोणकर गार्डनजवळ त्यांचा अपघात झाल्याची माहिती त्यांच्या मुलाला मिळाली. ते तातडीने घटनास्थळी पोहोचले असता त्यांच्या आईचा डावा पाय पूर्णपणे रक्तबंबाळ अवस्थेत होता. महिलेने काळ्या रंगाच्या टाटा हॅरियर कारने धडक दिल्याचे सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, कारचालकाने पायी जाणाऱ्या महिलेला जोरात धडक दिल्यानंतर जखमीला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन केले. जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर डोक्याच्या डाव्या बाजूस, डाव्या हाताला तसेच डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले.

सिटी स्कॅन आणि वैद्यकीय तपासणीनंतर डाव्या पायाची दुखापत गंभीर असल्याने शस्त्रक्रिया करून डावा पाय मांडीतून काढण्यात आला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी कारचालक जयराज पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक खोपडे पुढील तपास करत आहेत.

You may have missed