Pune Crime News | तुम्ही दगड मारत फिरला असता, मुलाने फाशी घेतली असती; महिलेला भिती घालून उघोरी पुजा करणार्या कमलेश अधिकारी, गौरी अधिकारीवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | यु ट्युबवर मंत्र शक्तीद्वारे मानसिक आजार बरा करण्याचा दावा करणार्या बाबाने महिलेला तुझ्यावर करणीबाधा, भूतबाधा व तंत्रविद्याबाधा झाली आहे. त्यासाठी अघोरी पुजा न केल्यास तू दगडे मारत फिरशील, तुझा मुलगा फाशी घेईल, अशी भिती दाखवून उज्जैन, जेजुरी, नाशिक, कोलकत्ता येथे अघोरी पुजा करुन घेऊन फसविणार्या मांत्रिक बाबा व त्याच्या पत्नीविरुद्ध लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कमलेश शिवकुमार अधिकारी (Kamlesh Shivkumar Adhikari) व त्याची पत्नी गौरी कमलेश अधिकारी Gauri Kamlesh Adhikari (रा. गोकुळधाम, पाथर्डी फाटा, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ५३ वर्षाच्या महिलेने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते जून २०२४ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती रेल्वेत गँगमन होते. निवृत्तीनंतर ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तीन वर्षांपूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना शारीरीक व मानसिक आजाराचा त्रास होत होता. त्यांनी व मुलाने मिळून युट्युब साईटवर मानसिक आजारावर उपचाराबाबत शोध घेत असताना त्यांना कमलेश शिवकुमार अधिकारी व गौरी अधिकारी यांचा व्हिडिओ मिळाला. त्यांनी बर्याच मानसिक आजारी लोकांचा आजार मंत्र तंत्र व विधीने बरा केल्याचा दावा केला होता. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर कमलेश व त्याची पत्नी गौरी अधिकारी हे त्यांच्या घरी आले. त्यांनी सायंकाळी ६ ते पहाटे २ वाजेपर्यंत पूजा केली. त्याचा खर्च म्हणून त्याने त्यांच्याकडून २ लाख रुपये घेतले. त्यांनी स्वत:चे गंठण गहाण ठेवून अधिकारी याला पैसे दिले. कमलेश याने सांगितले की बरे झाले तुम्ही पुजा केली, नाहीतर तुम्ही दगडे मारत फिरला असता, तुमच्या मुलाने फाशी घेतली असती, असे सांगून भिती दाखविली.
त्यानंतर त्याने उज्जैनला स्मशानभूमीत पुजा करावी लागेल, असे सांगून त्यांना तेथे घेऊन गेला. तेथे इतर लोकांना देखील त्याने बोलावून घेतले होते. अनेकांना त्याने एकाच हॉटेलमध्ये उतरवले होते. साधारण ८ दिवसात त्याने ज्यांना ज्यांना त्रास होत होता, त्या सर्वांना रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत स्मशानभूमीत घेऊन जात होता. त्या ठिकाणी जाळलेल्या मृतदेहाच्या राखेवर तो आघोरी पुजा करत होता. या अघोरी पुजेच्या खर्चापोटी त्यांच्याकडून ६० हजार रुपये घेतले. उज्जैन येथील सर्व खर्च त्यांनी केला. त्यानंतर शिवरात्रीला एक विधी करायचा आहे, असे म्हणून परत उज्जैनला सर्वांना घेऊन गेला. तेथे शिवरात्रीच्या आदल्या दिवशी आलेल्या सर्व लोकांना बोलावून तो व त्याची पत्नी गौरी असे शंकर पार्वतीचा अवतार आहेत. शिवरात्रीच्या पहाटे ४ वाजता त्याने स्वत:चे लग्न लावून घेतले.
त्यानंतर होम विधी करवुन घेतला. त्याचे ५० हजार रुपये त्यांच्याकडून घेतले. त्यानंतर ते जेजुरीला आले. तेथे कोंबडी व पुरण पोळीचा नैवैद्य केला. सत्यनारायण पुजा करण्यासाठी नाशिकला घेऊन गेले. त्यांना कोलकत्ता येथे नेले. तेथे आघोरी पुजा करण्यात आली. त्यासाठी ते विमानाने गेले होते. त्याचा सर्व खर्च फिर्यादीला करायला लावला. अघोरी पुजा व विधीमुळे काहीच फरक पडत नसल्याने तसेच बराच पैसा खर्च होत असल्याने त्यांनी नंतर कमलेश अधिकारी व गौरी अधिकारी यांचे फोन घेणे बंद केले. काही दिवसांपूर्वी कमलेश व गौरी अधिकारी यांनी लोकांच्या केलेल्या फसवणूकीबाबत वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. त्या पाहिल्यावर फसवणूक झालेल्या लोकांनी ऐकमेकांशी संपर्क साधून माहिती दिली. कमलेश व गौरी अधिकारी यांच्यावर नाशिक येथे गुन्हा दाखल झाला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधून त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितल्याने लोहगाव पोलीस ठाण्यात त्यांनी या दोघांनी ३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील तपास करीत आहेत.
