Delhi Fire News | दिल्लीत भीषण आग; रेस्टॉरंट दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जखमी
नवी दिल्ली : Delhi Fire News | देशाची राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत मोठी जीवितहानी झाली आहे. या दुर्घटनेत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून शेजारील दुकाने आणि इमारती रिकाम्या करण्यात आल्या. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
रेस्टॉरंटमध्ये अचानक उसळल्या आगीच्या ज्वाला
प्राथमिक माहितीनुसार, मालवीय नगरमधील एका इमारतीतील रेस्टॉरंटमध्ये सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. रेस्टॉरंटमधील लाकडी फर्निचर आणि इतर ज्वलनशील साहित्यामुळे आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले. धुराचे काळे लोट संपूर्ण परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण भाजले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सकाळी मिळाला आगीचा कॉल
दिल्ली अग्निशमन सेवेला सकाळी सुमारे ९.४५ वाजता आगीबाबतचा कॉल प्राप्त झाला. त्यानंतर अग्निशमन आणि बचाव पथकांना तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आग सकाळी अंदाजे ८.५० वाजता लागली होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्टॉरंटच्या तळघरातून तीन जणांना सुखरूप बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात दाखल केले. नेहरू प्लेस अग्निशमन केंद्राचे विभागीय अधिकारी रवींद्र यांच्या देखरेखीखाली बचावकार्य सुरू होते.
१० अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, जखमींवर उपचार सुरू असून परिसरातील इतर इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या आहेत. एका वरिष्ठ अग्निशमन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी १० अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. आग नियंत्रणात आल्यानंतरही इमारतीमध्ये कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली.
