Pune Hadapsar Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कवडीपाट येथे डंपरच्या धडकेत पेंटरचा जागीच मृत्यू

Pune Hadapsar Accident | Terrible accident on Pune-Solapur highway; Painter dies on the spot after being hit by dumper at Kavadipat

पुणे : Pune Hadapsar Accident | पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मोहन जगन्नाथ माळवदकर (वय ५६, रा. कवडीपाट, ता. हवेली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. माळवदकर हे व्यवसायाने पेंटर होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळवदकर हे मंगळवारी सकाळी कामानिमित्त दुचाकीवरून निघाले होते. कवडीपाट परिसरात रस्ता दुभाजक ओलांडत असताना हडपसरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मातीने भरलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, माळवदकर रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर डंपरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

You may have missed