Bhor Accident News | पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Bhor Accident News | Fatal accident on Pune-Satara highway; Two students die in collision with unknown vehicle

पुणे : Bhor Accident News |  पुणे-सातारा महामार्गावरील भोर तालुक्यातील सारोळे गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने पाठीमागून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. सोमवारी सायंकाळी हॉटेल नवलाईसमोर ही दुर्घटना घडली.

अपघातात तुषार दादासाहेब शिंदे (वय १७, रा. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) आणि अथर्व विजय पाटील (वय १७, रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजेंद्र गोविंद नेवसे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार आणि अथर्व हे जिवलग मित्र होते. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ते तीन दिवसांपूर्वी नव्याने घेतलेल्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून नसरापूर येथे गेले होते. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दोघेही आनंदाने शिरवळच्या दिशेने परतत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे अ‍ॅक्टिव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन पडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुषार शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अथर्व पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अपघातानंतर संबंधित वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शिरवळ आणि नायगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

You may have missed