Pune Fire News | पुणे : गॅस सिलेंडर बदलत असताना गॅस गळती होऊन स्फोट; एकाचा मृत्यू तर दोघी गंभीर जखमी, खराडीतील खांदवेनगर येथील घटना
पुणे : Pune Fire News | गॅस सिलेंडर बदलत असताना नोझलमधून गॅस गळती होऊन घरात स्फोट झाल्याने त्यात एकाचा मृत्यू झाला आहे तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना खराडीतील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी सोसायटीतील एका घरातील पहिल्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजता घडली.
पांडुरंग विष्णू गित्ते (वय 35) यांचा मृत्यू झाला आहे. विष्णू मुंजाजी गित्ते (वय ८२) आणि वृंदाविनी विष्णू गित्ते (वय ६०) अशी गंभीर जखमी असलेल्यांची नावे आहे. राजेश्री पांडुरंग गिते आणि निहारिका पांडुरंग गिते (वय ५ वर्षे) हा किरकोळ जखमी आहेत.
अग्निशामक दलाचे अधिकारी प्रमोद सोनावणे यांनी सांगितले की, खराडी येथील खांदवेनगर मध्ये एक मजली बैठे घर आहे. तेथील पहिल्या मजल्यावरील स्वयपांकघरातील गॅस सिलेंडर संपल्याने दुसरा सिलेंडर लावण्याचे काम सुरु होते. त्यावेळी नोझलमधून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाली. त्याचा आगीची संपर्क येताच त्याचा मोठा स्फोट होऊन आग लागली. अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यावर गाडी घटनास्थळी पोहचली. आग विझविण्यात आली असून जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गॅसचा स्फोट व त्यानंतर लागलेल्या आगीने संपूर्ण घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. स्फोटामुळे संडास, बाथरुमची दारे व इतर साहित्यांचे तुकडे तुकडे झाल्याचे विदारक दृश्य दिसून येत होते.
