Tukaram Munde | जेवणात किंवा औषधात भेसळ आहे? थेट तुकाराम मुंढेंना फोन करा; तक्रारीसाठी एफडीएकडून टोल फ्री क्रमांक जाहीर

Tukaram mundhe

मुंबई : Tukaram Munde | आपल्या धडाकेबाज आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कारभार स्वीकारताच राज्यातील अन्नभेसळखोर आणि प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. राज्यभरात कडक छापेसत्र सुरू करण्यात आले असून, आता थेट जनतेला यात सहभागी करून घेण्यासाठी आयुक्त मुंढे यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

आपल्या परिसरातील हॉटेल, मिठाई किंवा औषधांमध्ये होणाऱ्या भेसळीची माहिती नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता यावी यासाठी एफडीएकडून ‘१८००२२२३६५’ हा टोल फ्री क्रमांक आणि ‘jc-foodhq@gov.in’ हा ई-मेल आयडी जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी तक्रार करताना संबंधित दुकान किंवा हॉटेलचा अचूक पत्ता आणि भेसळयुक्त पदार्थाची सविस्तर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तुकाराम मुंढे यांनी पदभार हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडले आहेत. मसाला, गुटखा, दूध, पनीर, खाद्यतेल आणि आईस्क्रीम अशा मानवी आरोग्याशी थेट संबंधित असणाऱ्या विविध पदार्थांच्या साठ्यांवर राज्यभरात शेकडो ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

या धडक कारवाईत कोट्यवधी रुपयांचा संशयास्पद आणि भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला असून नियमबाह्य काम करणाऱ्या ८६ पेक्षा जास्त दुकानांना थेट टाळे ठोकण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी १०० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

You may have missed