Maharashtra Weather Alert | पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे; राज्यातील 27 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
पुणे : Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा जोर कमालीचा वाढला असून, पुढील २४ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आता तो वेगाने पुढे सरकत असून, पुढील २ ते ३ दिवसांत त्याचे महाराष्ट्रात अधिकृत आगमन होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील एकूण २७ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या हवामान अंदाजानुसार, राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ तर ३ जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाची जोरदार शक्यता आहे. या भागात दिवसा प्रचंड ढगाळ आणि दमट वातावरण राहील आणि संध्याकाळच्या सुमारास ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असून तापमानात घट झाली आहे. मात्र, वादळी वारे आणि विजा पडण्याची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे.
