State Excise Department Pune | विषारी दारुकांडनंतर 116 गावठी दारु विक्रेत्यांना अटक, 142 गुन्हे दाखल करुन गावठी दारु रसायनासह दीड कोटींचा माल राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त
पुणे : State Excise Department Pune | फुगेवाडी आणि हडपसर येथे घडलेल्या विषारी दारुकांडानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारु विक्री करणार्यांविरुद्ध मोहिम हाती घेतली असून आठवड्याभरात वेगवेगळ्या भागात छापे टाकून १४२ गुन्हे दाखल करुन ११६ गावठी दारु विक्रेत्यांना अटक केली आहे. या गुन्हात ८ हजार ४७२ लिटर गावठी दारु जप्त केली आहे. तसेच ५९ हजार २७१ लिटर रसायन जागीच नाश करण्यात आले आहे. दारुच्या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एकूण ११ वाहने जप्त करुन एकूण १ कोटी ४७ लाख २७ हजार १४५ रुपयांचा माल जप्त केला आहे.
फुगेवाडी आणि हडपसर परिसरात गावठी विषारी दारु पिऊन त्यात किमान २० जणांचा मृत्यु झाला असून अजूनही ८ जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने २९ मे ते ४ जून या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय आयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनखाली आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणेचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सर्व विक्री व निर्मितीचे हॉटस्पॉट संवेदनशील गाव येथील हातभट्टी केंद्र नेस्तनाबूत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच हातभट्टी निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवठादार यांना या गुन्ह्यात आरोपी करुन कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. सराईत गुन्हेगाराकडून दारूबंदी कायदाच्या कलम ९३ नुसार चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी एकूण १२५ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे.
विषारी दारू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा तपास सीआयडीशी समन्वय साधून करण्यात येत आहे.
मिथेनॉलचा बेकायदा कामांसाठी वापर करणार्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) मिथेनॉल पुरवठदारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. संशयास्पद व्यवहारांवर कारवाई करण्यात येणार आहे. गावठी दारू अड्ड्यावर वीज पुरवठा होत असल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागा कडून सर्व नागरिकांना अवैध गावठी दारुपासून दूर राहण्याच्या व अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्या गुन्हेगारांविषयी माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999 किंंवा दूरध्वनी क्रमांक 020 – 26127321 या वर संपर्क करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.
