Sandeep Khardekar | महाराष्ट्र वुशू संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप खर्डेकर तर सचिव पदी ललिता कटके यांची नियुक्ती

Sandeep Khardekar | Sandeep Khardekar appointed as the president of Maharashtra Wushu Association and Lalita Katke as the secretary

महाराष्ट्र राज्य वुशू पंच व ज्युरी कोर्सचे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

पुणे : Sandeep Khardekar | महाराष्ट्र वुशू संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप खर्डेकर तर सचिव पदी सौ. ललिता कटके यांची नियुक्ती केल्याचे वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे संयुक्त सचिव सोपानराव कटके यांनी जाहीर केले.

ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र राज्य वुशू रेफ्री अँड जजेस कोर्स २०२६” चे उद्घाटन सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य डोणजे गावातील प्रथमेश गो क्रेझी रिसॉर्ट येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात पार पडले.चार दिवस चाललेल्या ह्या निवासी प्रशिक्षण कोर्स चे आयोजन “महाराष्ट्रातील वुशू पंचांच्या गुणवत्तावृद्धीसाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे” असे सोपानराव कटके म्हणाले.

उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी श्री. संदीपजी खर्डेकर अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.आपल्या प्रेरणादायी मनोगतात त्यांनी महाराष्ट्रात वुशू खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशिक्षित आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच तयार होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी या प्रशिक्षण शिबिराचे कौतुक करत सहभागी पंचांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


या वेळी बोलताना संदीप खर्डेकर यांनी “शिवछत्रपती अवार्ड विजेते आणि अंतरराष्ट्रीय दर्ज्याचे खेळाडू सोपानराव कटके सरांचा “वुशू” खेळाच्या प्रचार प्रसारात मोठा वाटा असून आम्ही त्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली काम करू असे जाहीर करतानाच कटके सरांच्या कार्याचा गौरव केला.


यावेळी सोपानराव एस. कटके,संयुक्त सचिव, वुशू असोसिएशन ऑफ इंडिया,यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक नियमांची सखोल माहिती देत पंचांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत खेळ आणि खेळाडू घडविण्यात पंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सचिव ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन तथा संचालिका, रिया इंटरनॅशनल स्कूल सौ. ललिता कटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पंच, प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षकांचे स्वागत करून या कोर्सची उद्दिष्टे स्पष्ट केली.


या उद्घाटन सोहळ्यास टार्गेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे सरचिटणीस दादासाहेब भोरे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत महाराष्ट्रातील क्रीडा चळवळीला अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे नवी दिशा मिळत असल्याचे सांगितले.

विशेष बाब म्हणजे, वुशूच्या सांडा (Sanda) प्रकारासाठी श्री. ललित कुमार आणि ताओलू (Taolu) प्रकारासाठी श्री. अभिजीत ऐसवाल यांची अधिकृत प्रशिक्षक व परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली व त्यांनी प्रशिक्षणार्थींना आधुनिक पंचगिरीचे प्रशिक्षण दिले.

पाच दिवस चाललेल्या या निवासी शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेले १०० हून अधिक पंच, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक व वुशू पदाधिकारी सहभागी झाले. अत्याधुनिक पंचगिरीचे नियम, स्पर्धा संचालन, गुणांकन पद्धती आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार निर्णय प्रक्रिया यांचे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जात आहे.

या प्रशिक्षण शिबिरामुळे महाराष्ट्राला आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सक्षम, प्रशिक्षित आणि दर्जेदार पंचांची फळी उपलब्ध होणार असून, राज्यातील वुशू खेळाच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या शिबिरास शिवछत्रपती अवॉर्ड विजेते संदीप शेलार, तृप्ती चांदवडकर, प्रतीक्षा शिंदे इ खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र वुशू असोसिएशन च्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष संदीप खर्डेकर, उपाध्यक्ष जयंत घैसास, सचिव सौ. ललिता कटके,कोषाध्यक्ष साधना शेलार,तर रमा हटकर, सुनील शेंडे, तृप्ती चांदवडकर,उर्मिला कुटे, माधव शैरीकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे सोपानराव कटके यांनी जाहीर केले.

You may have missed