Pune Crime News | ज्येष्ठ शेतकरी महिलेला मारहाण करुन शेतात परत आली तर जीवे मारण्याची दिली धमकी, वेल्ह्यातील पाबे गावातील घटना
पुणे : Pune Crime News | शेतात काम करण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षाच्या शेतकरी महिलेला हाताने मारहाण करुन परत शेतात आली तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत कलाबाई रामभाऊ शिंदे (वय ६५, रा. खरीव ता. राजगड, वेल्हे) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मनोज मते (वय ३६, रा. खडकवासला), निलेश मरळ (वय ४०, रा. पाबे, ता. राजगड (वेल्हे), नवनाथ मरळ (वय ४०, रा. पाबे, ता. राजगड) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना राजगड तालुक्यातील पाबे येथील गट नंबर १७०१ मध्ये ६ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कलाबाई शिंदे यांची पुलाच्या मालकीची पाबे येथे जमीन आहे. ६ जून रोजी सकाळी त्या शेतात गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी हा गट आमचे मालकीचा आहे, तुम्ही कशाला इथे येता, असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन दमदाटी केली. पुन्हा जर येथे आला तर जीवे मारुन टाकू, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. शेताच्या बांधावरील झाडे व ऊस तोडून नुकसान केले. वेल्हे पोलीस तपास करीत आहेत.
