Pune Police News | पुण्यात बेकायदा सावकारीचे रॅकेट! पोलिस आयुक्तांकडे 8 जणांची तक्रार; तपासासाठी विशेष पथक नियुक्त, नागरिकांनी भीती न बाळगता पोलिस आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे : शहरातील नागरिकांना जाळ्यात ओढून बेकायदा सावकारी, आर्थिक फसवणूक, मालमत्ता बळकावणे आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करून मानसिक छळ केल्याच्या आरोपांप्रकरणी काही संशयितांविरोधात पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तपासासाठी विशेष पोलिस पथकाची नियुक्ती केली आहे.
भोलासिंग अरोरा, विजयकुमार सेठी, गणपत मगर यांच्यासह आठ जणांनी या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडे दाद मागितली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने प्रकरणाची दखल घेत कारवाईचे निर्देश दिल्यानंतर तक्रारदारांनी शुक्रवारी पोलिस आयुक्तांची भेट घेतली.
प्राथमिक कागदपत्रांवरून संशयित आरोपी ठराविक पद्धतीने काही कुटुंबांना लक्ष्य करत असल्याचे समोर आले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना बेकायदेशीर सावकारीच्या जाळ्यात अडकवून त्यांची मालमत्ता ताब्यात घेणे किंवा पैशांसाठी दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, विरोध करणाऱ्यांना अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात होती तसेच न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करून मानसिक छळ करण्यात येत होता. यासंदर्भातील आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत.
दरम्यान, विशेष पोलिस पथक सर्व तक्रारदारांचे जबाब नोंदवून आर्थिक आणि मालमत्ता व्यवहारांची सखोल चौकशी करणार आहे. “फसवणूक किंवा छळ झाल्यास नागरिकांनी भीती न बाळगता पोलिस आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
