Pune Crime News | व्यवसायासाठी 40 लाखांचे अनुदान देण्याचे आमिष दाखवून 40 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बहुजन क्रांती सेनेचा अध्यक्ष अमोल कृष्णा चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | बहुजन क्रांती सेना या संघटनेमार्फत व्यवसायासाठी ४० लाख रुपयांचे अनुदान मिळवुन देतो, असे सांगून संस्थेकडे काही रक्कम गुंतवणूक करायला सांगून महिलेसह इतरांची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
बहुजन क्रांती सेना या संघटनेचा अध्यक्ष अमोल कृष्णा चव्हाण Amol Krishna Chavan (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नुपुर नितीन झरकर (वय ३५, रा. लेक टाऊन सोसायटीजवळ, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बिबवेवाडीतील बहुजन क्रांती सेना या संघटनेच्या कार्यालयात २३ फेब्रुवारी २०२३ ते ७ जून २०२६ दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल रमेश झरकर (रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हे शैक्षणिक व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करतात. त्यांच्या ओळखीतून २०२३ मध्ये त्यांची अमोल चव्हाण यांच्याशी ओळख झाली. त्यांनी सांगितले की, बहुजन क्रांती सेना या संघटनेचे काम करतो. तुम्ही आमच्या संस्थेचे सभासद व्हा़ संस्थेत ३ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करा. आम्ही संस्थेमार्फत उद्योग धंद्यांसाठी शासकीय अनुदान ४० लाख रुपये मिळवुन देणार आहे. तुमच्या वडिलांनीही आमच्याकडे ठेव ठेवली आहे. वडिलांच्या ओळखीचे असल्याने त्यांनी विश्वास ठेवून ब्युटी पार्लरसाठी ४० लाख रुपयांचे अनुदान मिळावे, यासाठी त्या संस्थेच्या सभासद झाल्या.
त्यांनी २ लाख १४ हजार रुपये भरले. अनुदानाबाबत विचारल्यावर त्याने आणखी दुसर्या व्यवसायासाठी सभासद व्हा, दोन्हींचे एकदम अनुदान मिळवुन देतो, असे सांगितले. त्यांना मंगल क्लॉथ शॉप, इमिटेशन ज्वेलरीचे व्यवसायासाठी सभासद करुन घेतले. वेळोवेळी त्यांच्याकडून १६ लाख ४४ हजार रुपये अमोल चव्हाण याने घेतले. अनुदानाबाबत विचारल्यावर त्याने शासनाकडून तुमचे अनुदान मंजुर करुन घेतलेले आहे. काही दिवसात तुम्हाला रक्कम मिळेल, असे सागून त्याने २०२५ पर्यंत टाळाटाळ केली. तेव्हा त्यांनी पैसे परत मागितले. त्यावर त्याने नावात जाणीवपूर्वक चुका करुन धनादेश दिले. ते बँकेतून परत आले. त्यांनी चौकशी केल्यावर त्यांचे वडिल, काका यांच्याकडूनही अमोल चव्हाण याने शासकीय अनुदानासाठी ३ लाख रुपये घेतलेले आहेत. तसेच इतर नातेवाईक यांच्याकडूनही उद्योग धंद्यासाठी शासकीय अनुदान मिळवुन देतो, असे आश्वासन दाखवुन एकूण ४० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तपास करीत आहेत.
