Pune Crime News | चारित्र्याचा संशय महिलेवर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या एअर फोर्समधील सार्जंटला वानवडी पोलिसांनी केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | ७ वर्षांपासून एकमेकांचे ओळख असताना चारित्र्याचा संशय घेऊन महिलेच्या चेहर्‍यावर, गळ्यावर वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या एअर फोर्समधील सार्जंटला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

सचिन लक्ष्मण मांढवे Sachin Laxman Mandhve (वय ३७, रा. सातारा) असे या सार्जंटचे नाव आहे. याबाबत आंबेगाव पठार येथे राहणार्‍या ४४ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना वानवडीतील ए आय सीटी एस हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये ६ जून रोजी दुपारी अडीच वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मांढवे हा एअर फोर्समध्ये सार्जंट असून सध्या त्याची तेजपूर येथे पोस्टिंग आहे. सध्या तो सुट्टीवर आला आहे. ७ वर्षांपूर्वी फिर्यादी या लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशनमधील कॅन्टिनमध्ये कामाला होत्या. त्यावेळी त्यांची सचिन मांढवे याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून तो नेहमी त्यांच्याकडे येत असे. त्यांच्यामध्ये काही आर्थिक व्यवहारही होत होते. सध्या त्या ए आय सी टी एस हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये काम करतात. ६ जून रोजी सचिन मांढवे यांना भेटायला आला. त्यांना पार्किंगमध्ये बोलावले. तो त्यांच्या चारित्र्यावरुन संशय घेऊ लागला. त्यातून त्यांच्या वाद झाला. त्यावेळी सचिन याने त्यांना शिवीगाळ करुन धारदार हत्याराने त्यांच्या डोळ्यावर, चेहर्‍यावर तसेच गळ्यावर वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना समजताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सचिन मांढवे याला अटक केली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी ४ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे तपास करीत आहेत.

You may have missed